भस्माच्या आमिषाने तीन लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 01:00 AM2018-10-12T01:00:26+5:302018-10-12T01:01:38+5:30
मानसोपचार तज्ज्ञाचे उपचार सुरू असलेल्या मुलीला बरे करण्याचे आमिष दाखवून, चमत्कारी भस्माचा हवाला देऊन व वेळोवेळी होम करण्यास भाग पाडून तीन लाखांपेक्षाही अधिक रकमेची फसवणूक केल्याप्रकरणी चारजण पोलिसांच्या जाळ्याात सापडले. मोटार सायकलच्या नंबरवरून नांदगाव पोलिसांनी हा गुन्हा उघड केला. दरम्यान लुबाडलेल्या रकमेपैकी दीड लाख रुपये परत मिळविण्यात पोलिसांना यश आले आहे.
नांदगाव : मानसोपचार तज्ज्ञाचे उपचार सुरू असलेल्या मुलीला बरे करण्याचे आमिष दाखवून, चमत्कारी भस्माचा हवाला देऊन व वेळोवेळी होम करण्यास भाग पाडून तीन लाखांपेक्षाही अधिक रकमेची फसवणूक केल्याप्रकरणी चारजण पोलिसांच्या जाळ्याात सापडले. मोटार सायकलच्या नंबरवरून नांदगाव पोलिसांनी हा गुन्हा उघड केला. दरम्यान लुबाडलेल्या रकमेपैकी दीड लाख रुपये परत मिळविण्यात पोलिसांना यश आले आहे.
रवींद्र साळुंके ऊर्फ स्वप्नील महाराज (२५) व संजय सुपेकर ऊर्फ रामचंद्र महाराज (२९) दोघे रा. कोळपेवाडी ता. कोपरगाव, व अंकित मोरे तथा रवींद्र वाघाडकर (२२) व दिलीप पोते (३२) अशी पोलिसांनी पकडलेल्या चौघांची नावे आहेत.
नांदगाव शहराजवळ पाटखाना भागात मुकुंद पाटील व त्यांची बहीण वैशाली राहतात. जानेवारी महिन्यात एके दिवशी दुपारी १ वाजता गोशाळेला दान मिळविण्याच्या निमित्ताने फिरत फिरत घरी आलेल्या वरील चार जणांनी गोड बोलून व आपणाकडे दैवी चमत्काराची उपचार पद्धती असल्याचा दावा करून पाटील कुटुंबीयांचा विश्वास संपादन केला. कथित भस्माचे द्रावण (ज्याच्यात फक्त मध व जिलेबीचा रंग) देऊन पूर्ण बरे करण्याचा दावाही त्यांनी केला. मानसोपचार तज्ज्ञापेक्षा हा बरे होण्याचा झटपट मार्ग पाटील याना चांगला वाटल्याने ते या चौघांच्या बरे करण्याच्या दाव्यांवर भाळले आणि तेथूनच पैसे उकळण्याचा सिलसिला सुरू झाला. आधी ६००० रुपये कोपरगावला नंतर २३ हजार रुपये घेतले गेला. तरीही गुण येत नाही म्हणून नांदगावला पाटखाना येथील घरी ३५ हजार रुपयांचा होम... ५५ हजारांचा उपचार विधी... पुन: पाच हजारांचे अद्भुत भस्म... मध्ये मध्ये काही रकमा... आणि शेवटी १ लाख रुपयांचा कायापालट भस्म विधीचा जालीम उपाय अशी बनवाबनवी सुरू होती. कायापालटाचे १ लाख रु पये मिळण्यापूर्वी हे केले नाही तर आधीचे विधी वाया जातील अशी भीती घालण्यात आली. ३ लाखांपेक्षा अधिक रक्कम घालवल्यानंतर मुकुंद पाटील यांनी पोलिसांकडे धाव घेतली.
केवळ दुचाकी क्रमांकाचा धागा
या घटनाक्र मात तपास करताना पोलिसांकडे फक्त दुचाकी (क्र. एमएच १७ बीई ८३४६) एवढा एकच धागा होता. त्यावरून त्यांनी माग काढला. पाटील यांनी जून २०१८ मध्ये याबाबत फिर्याद दिली होती.