परदेशात शिक्षणाचे आमिष दाखवून तीन लाखांना गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2022 01:27 AM2022-03-09T01:27:48+5:302022-03-09T01:28:08+5:30
परदेशात शिक्षणासाठी पाठविण्याचे आमिष दाखवून कॉलेज रोडवरील एका खासगी अकॅडमीच्या महिला संचालकाकडन एका हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्याच्या पालकाकडून दोन लाख ८० हजार रुपये उकळून फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानंतर गंगापूर पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक : परदेशात शिक्षणासाठी पाठविण्याचे आमिष दाखवून कॉलेज रोडवरील एका खासगी अकॅडमीच्या महिला संचालकाकडन एका हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्याच्या पालकाकडून दोन लाख ८० हजार रुपये उकळून फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानंतर गंगापूर पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
न्यायालयाच्या आदेशानुसार, गंगापूर पोलीस ठाण्यात नारायण दगू शिंदे (४७, रा. मखमलाबाद रोड) यांच्या फिर्यादीवरून संशयित संचालक रागिणी प्रफुल्ल सोमठानकर (रा. कॉलेजरोड) यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे यांच्या फिर्यादीनुसार सप्टेंबर २०२० पासून संशयित सोमठानकर यांनी त्यांच्याकडून वेळोवेळी रक्कम घेत आर्थिक फसवणूक केली. शिंदे यांचा मुलगा प्रीतेश यास फ्रान्स किंवा इटली या देशात शिक्षण घेण्यासाठी जायचे होते. यासाठी शिंदे यांनी सोमठानकर यांच्या अकॅडमीशी संपर्क साधला हाेता. प्रवेश, व्हिसा, शिष्यवृत्ती आदी प्रक्रिया पूर्ण करून देण्यासाठी कन्सस्टन्सीच्या सोमठाणकर यांनी शिंदे यांच्याकडून ऑनलाईन पद्धतीने एकूण दोन लाख ८० हजार रुपये घेतले; मात्र प्रीतेशची प्रत्यक्षात सोमठानकर यांनी प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली नाही. शिंदे यांनी याबात त्यांना विचारणा केली असता त्यांनी प्रीतेशचा प्रवेश नाकारण्यात आला असे सांगितले. ‘तुम्हाला पैसे भेटणार नाहीत, सुरक्षारक्षकांकडून हातपाय तोडून टाकू’ अशी धमकीही दिल्याचे फिर्यादीत शिंदे यांनी म्हटल्याचे पोलिसांनी सांगितले.
---इन्फो---
पुढील शिक्षणाला ‘ब्रेक’
या फसवणुकीमुळे दोन वर्षांपासून प्रीतेशच्या पुढील शिक्षणाला ब्रेक लागला आहे. त्यामुळे शिंदे यांनी वर्षभर सातत्याने याबाबत पाठपुरावा केल्यानंतरही संशयितेने पैसे देण्यास नकार दिला आणि त्यांना दमदाटी केली. यामुळे शिंदे यांनी पोलिसांकडे तक्रार केली. मात्र पोलिसांकडून त्यांच्या तक्रारीची दखल घेण्यात आली नव्हती. त्यामुळे शिंदे यांनी न्यायालयात त्याविरोधात दाद मागितली. शिंदे यांच्या वतीने ॲड. राहुल पाटील यांनी न्यायालयात बाजू मांडली. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार गंगापूर पोलीस ठाण्यात संशयित सोमठाणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.