तीन लाख विद्यार्थ्यांना सुट्टीतही मिळणार आहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2019 11:50 PM2019-05-05T23:50:10+5:302019-05-05T23:52:48+5:30
नाशिक : दुष्काळग्रस्त आणि टंचाईसदृश गावांमधील विद्यार्थ्यांना शालेय सुट्टीतही पोषण आहार पुरविण्यात येणार असून, त्याचा लाभ जिल्ह्यातील बारा तालुक्यांमधील सुमारे तीन लाख विद्यार्थ्यांना होणार आहे. यासंदर्भात करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार अडीच हजार शाळांमधील विद्यार्थी पात्र ठरले आहेत. याबाबतच्या सूचना गटशिक्षणाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.
नाशिक : दुष्काळग्रस्त आणि टंचाईसदृश गावांमधील विद्यार्थ्यांना शालेय सुट्टीतही पोषण आहार पुरविण्यात येणार असून, त्याचा लाभ जिल्ह्यातील बारा तालुक्यांमधील सुमारे तीन लाख विद्यार्थ्यांना होणार आहे. यासंदर्भात करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार अडीच हजार शाळांमधील विद्यार्थी पात्र ठरले आहेत. याबाबतच्या सूचना गटशिक्षणाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे गाव-खेड्यातील नागरिकांपुढे पाणी आणि अन्नाचा मोठा प्रश्न आहे. निदान विद्यार्थ्यांच्या अन्नाचा प्रश्न मिटविण्यासाठी शाळेला सुटी असतानादेखील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार पुरविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील बागलाण, मालेगाव, नांदगाव आणि सिन्नर या दुष्काळी भागातील शाळांमधील विद्यार्थी तसेच देवळा, इगतपुरी, नाशिक आणि चांदवड या टंचाईसदृश तालुक्यांमधील विद्यार्थ्यांना शाालेय पोषण आहार पुरविला जाणार आहे. कळवण, दिंडोरी, निफाड आणि येवला या तालुक्यांमधील काही गणांमधील गावे दुष्काळी असल्याने त्यांनादेखील पोषण आहार पुरविण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.या योजनेत आठ तालुक्यांमधील शंभर टक्के विद्यार्थ्यांना आहारासाठी पात्र ठरविण्यात आले आहे, तर उर्वरित कळवण, दिंडोरी, निफाड आणि येवला येथील काहीच शाळांमधील विद्यार्थी लाभार्थी ठरणार आहेत. बागलाणमधील ३८० शाळांमधील (४४,२७७), मालेगाव ४१८ शाळांमधील (७८,४४९), नांदगाव येथील २८५ शाळांमधील (३६,९४१), सिन्नरमधील २६५ शाळांचे (३८,७४०), देवळा तालुक्यातील १५२ शाळांमधील (१८,८६३), इगतपुरी तालुक्यातील २६७ शाळांचे (३१,३७०), नाशिक तालुक्यातील १३५ शाळांमधील (२०,९३३), चांदवडमधील २४० शाळांचे (२९,४३१), कळवणमधील ११५ शाळांचे (१२,५५७), दिंडोरी तालुक्यातील ५० शाळांमधील (७७७९), निफाड तालुक्यातील १८१ शाळांमधील (२९,१८८) तर येवला येथील २४१ शाळांमधील (२३,०३२ विद्यार्थ्यांना) शालेय पोषण आहाराचा लाभ मिळणार आहे.
इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थी या योजनेसाठी पात्र धरण्यात आले आहेत. या विद्यार्थ्यांना सुटीत शालेय पोषण आहार देण्याची जबाबदारी शिक्षकांवर सोपविण्यात आली आहे. शाळेच्या जवळ असणाऱ्या कोणत्याही एका शिक्षकाला शाळेत येऊन मुलांना खिचडी देण्याची जबाबदारी देण्यात यावी, अशी सूचना करण्यात आली आहे. किती मुलांना खिचडी देण्यात आली याची नोंददेखील घेण्यात येणार आहे. सुटीच्या कालावधीत शालेय विद्यार्थ्यांबरोबरच इतर मुले आले तरी त्यांनादेखील खिचडी देण्यात यावी, असेदेखील सुचविण्यात आले आहे.
अतिरिक्त तांदळाची तरतूदनाशिक जिल्ह्यात दुष्काळग्रस्त टंचाईसदृश भागातील शाळांमध्ये पात्र
विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन देण्याकरिता अतिरिक्त तांदूळ नियतन मंजूर करण्यात आले आहे. सदर तांदूळ नियतन उचल करून तत्काळ शाळांना
वाटप करण्यात यावे, तसेच तांदूळ व्यपगत झाल्यास व दुष्काळात तांदूळ
अपुरा पडल्यास प्रशासकीय कारवाईचा इशारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी दिला आहे.