दाभाडीत आढळली बिबट्याची तीन बछडे; नागरिकांमध्ये पसरली दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2022 06:18 PM2022-09-05T18:18:03+5:302022-09-05T18:20:05+5:30
सदर पिल्लाची माहिती वन अधिकारी यांना दिल्यानंतर वनरक्षक दिपक हिरे यांनी भेट देत पाहणी केली व नागरिकांच्या मागणीनुसार पिंजरा आणण्यात आला.
निलेश नहिरे
नाशिक - मालेगाव तालुक्याला नजीक असणाऱ्या दाभाडी गावातील त्रिवेणी व लोंढानाला शिवारात गेल्या पाच महिन्यांपासून बिबट्याचा धुमाकूळ सुरू आहे. सोमवारी सकाळी दिलीप बारकू निकम यांच्या त्रिवेणी शिवारातील मातोश्री फार्म मध्ये बिबट्याची तीन बछडे आढळून आली आहेत. यामुळे गावात व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दाभाडी गावातील त्रिवेणी शिवारात गेल्या मे महिन्यात बिबट्याकडून प्राण्यांवर हल्ला झाला. त्यात दिपक निकम यांचे वासरू ठार झाले. त्यानंतर त्याच शिवारात बिबट्याकडून प्राण्यांवर वारंवार हल्ले होत कारभारी निकम व पुंडलिक निकम यांचे पायडू व शंकर निकम यांच्या चार बकऱ्या ठार केल्या आहेत. मागील काळात वन विभागाकडून पिंजराही लावण्यात आला होता मात्र बिबट्या पकडण्यात अपयश आले. आता तर बिबट्याची तीन बछडे आढल्याने बिबट्याचा या परिसरातील अधिवास अधोरेखित झाला आहे.
सदर पिल्लाची माहिती वन अधिकारी यांना दिल्यानंतर वनरक्षक दिपक हिरे यांनी भेट देत पाहणी केली व नागरिकांच्या मागणीनुसार पिंजरा आणण्यात आला. मात्र घटनास्थळी पिंजरा येईपर्यंत बिबट्याने पिल्ले उचलून नेलित. यावेळी पुंडलिक निकम, योगेश निकम, सतीश निकम, गुलाब निकम, दिलीप निकम, संजय अहिरे, रोशन अहिरे, अशोक निकम, हरी निकम, नितीन निकम, गौरव काळे, तुषार निकम, केदाजी निकम, गणेश नवले, बाळासाहेब नवले, राजेंद्र निकम, चेतन निकम, योगेश राजाराम, उमेश निकम, संजय निकम आदींसह शेतकरी बांधव उपस्थित होते.
आमच्या त्रिवेणी शिवारात अनेक दिवसांपासून बिबट्याचा प्राण्यांवर हल्ला होत आहे, मागील काळात पिंजरा ही लावण्यात आला होता मात्र काही उपयोग झाला नाही. पुढील काळात एखादी मोठी जीवित हानी होऊ नये म्हणून वन विभागाने कठोर पाऊले उचलून बिबट्याचा बंदोबस्त करावा. - योगेश निकम, शेतकरी