हिंगणवेढे शिवारात तीन बिबट्याची पिल्ले आढळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 07:22 PM2019-06-04T19:22:33+5:302019-06-04T19:24:15+5:30
हिंगणवेढे शिवारात यमाजी नागरे यांच्या शेतात गेल्या आठवड्यात कांद्याच्या पातीच्या बांधालगत बिबट्याच्या पंजाचे ठसे आढळून आले. रात्री उशिरा कुत्र्यांच्या भुंकण्याच्या आवाजाने यमाजी नागरे यांनी बॅटरीच्या उजेडात पाहिले असता बिबट्याच्या मादीसह दोन पिल्ले पाठोपाठ जातांना नजरेस पडले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
एकलहरे : हिंगणवेढे शिवारात बिबट्याची मादी व तिच्या पिलांचा वावर आढळून आल्याने दिवसा ढवळ्या नागरिकांना बिबट्याचे दर्शन होत असतानाच जाखोरी-हिंगणवेढा शिवारात उसाच्या शेतात नुकतीच जन्मलेली बिबट्याची तीन पिल्ले आढळून आली आहेत. त्यामुळे या परिसरात ४ ते ५ बिबट्यांचा वावर असावा अशी शक्यता वर्तविली जात आहे.
हिंगणवेढे शिवारात यमाजी नागरे यांच्या शेतात गेल्या आठवड्यात कांद्याच्या पातीच्या बांधालगत बिबट्याच्या पंजाचे ठसे आढळून आले. रात्री उशिरा कुत्र्यांच्या भुंकण्याच्या आवाजाने यमाजी नागरे यांनी बॅटरीच्या उजेडात पाहिले असता बिबट्याच्या मादीसह दोन पिल्ले पाठोपाठ जातांना नजरेस पडले होते. एकलहरे शिवरस्ता व हिंगणवेढे शिवारातील बहुतेक ठिकाणी उसतोड झाल्याने बिबट्याला लपण्यासाठी जागा राहिली नाही. त्यामुळे त्याचे अन्यत्र वास्तव्य वाढले असून, परिणामी शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसादेखील एकटे दुकटे फिरण्यास शेतकरी धजावत नसून, गेल्याच आठवड्यात जाखोरी चांदगिरी रस्त्यावर लागोपाठ दोन दिवस बिबट्याने दुचाकी स्वारांना झडप घालून जायबंदी केले आहे. या संदर्भात वारंवार वन खात्याला कळवूनही त्याची दखल घेतली जात नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.
हिंगणवेढे व जाखोरी शिवारातच सध्या बºयापैकी उसाचे क्षेत्र आहे. त्यामुळे बिबट्यांना लपण्यासाठी व सुरक्षिततेसाठी जागा असल्याने तेथील एका उसाच्या शेतात नुकतीच जन्मलेली बिबट्याची तीन पिल्ले आढळून आली. त्यामुळे या भागात बिबट्यांच्या वावरावर शिक्कामोर्तब झाले असून, त्यांची संख्या ४ ते ५ असावी, असा अंदाज वर्तविला जात आहे.