देवळा मुद्रांक घोटाळा चौकशीसाठी तीन सदस्यीय पथक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 10:23 PM2021-02-09T22:23:44+5:302021-02-10T00:53:48+5:30
देवळा : देवळा येथील मुद्रांक घोटाळा प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन जिल्हा मुद्रांक अधिकाऱ्यांनी तत्काळ तीन सदस्यीस पथकाची नेमणूक केली असून हे पथक देवळा येथील दुय्यम निबंधक कार्यालयात चौकशीसाठी पाठविण्यात आल्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

यामुळे देवळा येथील दुय्यम निबंधक कार्यालयात यापूर्वी खरेदी विक्रीच्या व्यवहारात झालेले गैरप्रकार उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. देवळा येथील मुद्रांक छेडछाड प्रकरण सर्वत्र चर्चेचा विषय ठरले असून जुने मुद्रांक काढून त्यात फेरफार करून खरेदी-विक्रीच्या व्यवहारात त्याचा वापर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
मुद्रांकात नेमकी कुणी छेडछाड केली याचा शोध तपास अधिकारी घेत आहेत. सोमवारी (दि.८) एकाच क्रमांकाचे दोन मुद्रांक व त्यात झालेली छेडछाड याची माहिती घेण्यासाठी जिल्हा मुद्रांक अधिकारी कैलास दवंगे यांनी त्रिसदस्यीय समिती देवळा येथे चौकशीसाठी पाठविली असून मंगळवारी (दि.९) दिवसभर देवळा येथील दुय्यम निबंधक कार्यालयात समितीच्या वतीने कागदपत्रे जमा करण्याचे काम चालू होते.
याबाबत सदर समितीकडे विचारणा केली असता याचा अहवाल आम्ही जिल्हा मुद्रांक अधिकाऱ्यांना देणार असल्याचे त्यांनी सांगितले.