विधान परिषदेचे तिन्ही उमेदवार कोट्यधीश निवडणूक : परवेज कोकणी आघाडीवर, नरेंद्र दराडेंनंतर शिवाजी सहाणे मालामाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 12:32 AM2018-05-04T00:32:58+5:302018-05-04T05:24:34+5:30
विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीच्या रिंगणातील प्रमुख तीन उमेदवारांनी आपली स्थावर व जंगम मालमत्ता जाहीर केली.
नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीच्या रिंगणातील प्रमुख तीन उमेदवारांनी आपली स्थावर व जंगम मालमत्ता जाहीर केली असून, त्यात जिल्हा विकास आघाडीचे उमेदवार परवेज कोकणी यांनी सर्वाधिक ८१ कोटींची मालमत्ता जाहीर केली आहे. त्याखालोखाल सेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्याकडे ५१ कोटी तर राष्टÑवादीचे उमेदवार शिवाजी सहाणे यांनी २१ कोटी रुपयांची मालमत्ता दाखविली आहे. याशिवाय दराडे व सहाणे यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल असून, कोकणी यांच्यावर मात्र कोणताही ठपका नाही. उमेदवारांनी नामांकन दाखल करतेवेळी आपली व आपल्या कुटुंबीयांच्या नावे असलेल्या मालमत्तेचा गोषवारा शपथेवर दाखल करण्याची तरतूद निवडणूक कायद्यातच आहे. त्यानुसार परवेज कोकणी यांच्या नावावर गोवर्धन, झारवड, सामुंडी, पिंपरी, तळेगाव, मखमलाबाद, नाशिक, वडाळा शिवार व त्र्यंबकेश्वर येथे शेतजमिनी असून, बॅँकेतील रोकड, सोन्या, चांदीचे दागिने व वाहने असे मिळून २ कोटी ४ लाख ९१ हजार २७४ रुपये किंमत आहे. कुटुंबातील सदस्यांकडील मालमत्ता मिळून एकूण ८१ कोटी १५ लाख ३५ हजार इतकी मालमत्ता जाहीर केली आहे. तर नरेंद्र दराडे यांच्या नावे नाशिक, येवला, गोतसाई (कल्याण), मखमलाबाद, जळगाव नेऊर, कोटमगाव, निमगाव मढ याठिकाणी जमिनी असून, बॅँकेतील रोकड, सोन्या चांदीचे दागिने व वाहनांची किंमत मिळून एकूण ५१ कोटी रुपयांची मालमत्ता आहे. शिवाजी सहाणे यांच्याकडे देवळाली शिवारातील घर, आगरटाकळी, चांदशी, नाशिक शिवार, दसक, कामटवाडे, चिंचोली शिवारात जमिनी असून, याशिवाय बॅँकेतील रोकड, सोन्या-चांदीचे दागिने असे सर्व मिळून २१ कोटी ६४ लाख ३१ हजार २८७ रुपयांची मालमत्ता आहे. उमेदवारांच्या मालमत्तेबरोबरच त्यांनी त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबतही माहिती सादर केल्याने दराडे व सहाणे या दोघांवरही फसवणुकीचे गुन्हे दाखल असून, परवेज कोकणी यांची पाटी मात्र कोरी आहे.