एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2022 01:41 AM2022-04-30T01:41:04+5:302022-04-30T01:41:32+5:30
बागलाण तालुक्यातील महड गावातील शेतकरी बाळू शिवबा सोनवणे यांच्या कुटुंबातील तीन जणांचा दोन दिवसांमध्ये अचानक मृत्यू झाला आहे. या मृत्यूंच्या कारणाबाबत आरोग्य विभागालाही कल्पना आली नसल्याने यामागील गूढ वाढले आहे. या कुटुंबातील आणखी एकावर नाशिकमध्ये उपचार सुरू आहेत.
नामपूर : बागलाण तालुक्यातील महड गावातील शेतकरी बाळू शिवबा सोनवणे यांच्या कुटुंबातील तीन जणांचा दोन दिवसांमध्ये अचानक मृत्यू झाला आहे. या मृत्यूंच्या कारणाबाबत आरोग्य विभागालाही कल्पना आली नसल्याने यामागील गूढ वाढले आहे. या कुटुंबातील आणखी एकावर नाशिकमध्ये उपचार सुरू आहेत.
महड गावातील शेतकरी बाळू सोनवणे नेहमीप्रमाणे दिवसभर शेतात काबाडकष्ट करून रात्री शेतातीलच पत्र्याच्या खोलीत कुटुंबासोबत झोपले होते. दुसऱ्या दिवशी पहाटे झोपेतून उठल्यावर सर्वांना अस्वस्थ वाटू लागले. डोळे उघडत नव्हते, हातापायांची हालचाल करता येत नव्हती. उपचारासाठी या सर्वांना तत्काळ मालेगाव व पुढे नाशिकला पाठविण्यात आले. तेथे उपचार सुरू असतानाच बाळू शिवबा सोनवणे (६८) व हरिभाऊ अनिल सोनवणे (१२) यांचा मृत्यू झाला. त्यांना कोणताही आजार नव्हता. तसेच विषबाधा अथवा सर्पदंशही झालेला नाही. हे मृत्यू नेमके कशामुळे झाले, असा प्रश्न आरोग्य खात्यालासुद्धा पडला आहे. त्यांच्या शवविच्छेदन अहवालातही मृत्यूचे रहस्य उलगडले नाही.
घरातील सरिता अनिल सोनवणे (१६) व नंदाबाई अनिल सोनवणे (४०) या दोघींवर नाशिकच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना सरिताचाही शुक्रवारी मृत्यू झाला.
गेल्या दोन दिवसांमध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.