तीस अधिकाऱ्यांना तीन महिन्यांचे वेतन अदा
By Admin | Published: February 18, 2017 12:23 AM2017-02-18T00:23:38+5:302017-02-18T00:23:52+5:30
तीस अधिकाऱ्यांना तीन महिन्यांचे वेतन अदा
नाशिक : जिल्हा परिषदेच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतील तीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे गेल्या तीन महिन्यांपासून रखडलेले वेतन अखेर शुक्रवारी (दि.१७) जिल्हा नियोजन मंडळाने पन्नास लाखांचा निधी वर्ग केल्याने झाले. विशेष म्हणजे याबाबत सर्वप्रथम वृत्त लोकमतनेच ११ जानेवारीच्या अंकात ‘तीस अधिकारी वेतनापासून वंचित, पालकमंत्र्यांना घातले साकडे’ या मथळ्याखाली दिले होते. तद््नंतर राज्यातील काही जिल्हा परिषदांच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांचे वेतन अदा झाले. मात्र नाशिक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या सुमारे तीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे गेल्या तीन महिन्यांपासूनचे वेतन प्रलंबित होते. याबाबत पालकमंत्री गिरीश महाजन व ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनाही संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांनी वेतन होण्याबाबत निवेदन दिले होते. या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन जिल्हा नियोजन मंडळाने त्यांच्याकडील निधीतून करावे, याबाबत शासनाने राज्यातील सर्व जिल्हा नियोजन मंडळांना आदेशित केले होते. त्यानुसार नाशिक जिल्हा नियोजन मंडळ अधिकारी योगेश चौधरी यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या तीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी पन्नास लाखांचा निधी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे वितरीत केला आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्याचे तीन महिन्यांपासून रखडलेले वेतन मिळाले आहे. (प्रतिनिधी)