वटवृक्ष कोसळल्याने तिघे जखमी
By admin | Published: August 4, 2016 01:44 AM2016-08-04T01:44:19+5:302016-08-04T01:44:46+5:30
राममंदिराजवळील घटना : सहा वाहनांचे नुकसान
पंचवटी : श्री काळाराम मंदिर पूर्व दरवाजाजवळचा सुमारे ७० वर्षे जुना वटवृक्ष बुधवारी कोसळला. या वृक्षाखाली असलेल्या दुकानात बसलेल्या एका दाम्पत्यासह तीन जण जखमी झाले असून वृक्षाखाली दबल्याने तीन दुकानांसह सहा वाहनांचे नुकसान झाले.
कोसळलेल्या वडाचा विस्तार मोठा असल्याने पूर्ण रस्त्यावर पडलेल्या फांद्या छाटून बाजूला करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. पूर्व दरवाजाजवळ असलेल्या गरुडरथाच्या बाजूला ६५ ते ७० वर्षांपूर्वीचा जुना वटवृक्ष सलग दोन दिवस झालेल्या पावसामुळे बुंध्याखालची माती भिजल्याने कोसळला. या वृक्षाखाली पूजा साहित्य विक्रीच्या दुकानात बाळासाहेब मुर्तडक व त्यांच्या पत्नी सरला मुर्तडक बसलेले होते. या दाम्पत्यासह अन्य एक असे तिघे वृक्षाच्या फांदीखाली दबले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी शेकडोच्या संख्येने गर्दी केली. त्यांनी अग्निशमन दलाला माहिती कळविली. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचताच पोलीस व स्थानिक नागरिकांच्या मदतीने झाडाखाली अडकलेल्या तिघांनाही बाहेर काढण्यात आले. या घटनेत मुर्तडक किरकोळ जखमी झाले असून त्यांच्या पत्नीला गंभीर दुखापत झाली आहे. (वार्ताहर)