५गुजरातच्या भाविकांची बस दरीत कोसळून तीन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 12:59 AM2019-03-25T00:59:35+5:302019-03-25T00:59:49+5:30
त्र्यंबकेश्वर/नाशिक : त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन आटोपून दुपारी दीड वाजेच्या सुमारास गुजरातमधील भाविक महालक्ष्मी देवी चारोटी नाक्याकडे जात असताना पालघर ...
त्र्यंबकेश्वर/नाशिक : त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन आटोपून दुपारी दीड वाजेच्या सुमारास गुजरातमधील भाविक महालक्ष्मी देवी चारोटी नाक्याकडे जात असताना पालघर जिल्ह्यातील तोरंगण घाटात अतितीव्र उतारावर खासगी बसचे ब्रेक निकामी झाल्याने बस ८० फूट खाली दरीत कोसळली. त्यात तीन प्रवाशांचा मृत्यू झाला. मृतांची नावे समजलेली नाहीत. ३८ प्रवासी जखमी झाले आहेत.
मोखाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी (दि.२४) दुपारी दोन वाजेच्या सुमारास तोरंगण घाटातून डहाणू येथील महालक्ष्मी मंदिराच्या दिशेने मार्गस्थ होत असलेल्या गुजरात राज्याच्या (जीजे १७, यूयू ११४८) या खासगी बसला अपघात झाला. बस घाट ओलांडून पुढे आली असता तीव्र उतारावर ब्रेक निकामी झाल्याने चालकाचा ताबा सुटला आणि बस थेट दरीत कोसळली. या अपघातात तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर उर्वरित ३८ प्रवासी जखमी झाले आहेत. मयतांमध्ये दोन महिला, एका पुरुषाचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच तत्काळ शासनाच्या (टोल फ्री १०८ मदतवाहिनी) आठ ते दहा रुग्णवाहिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यामधून जखमींना त्र्यंबकेश्वर, मोखाडा, नाशिकच्या सरकारी रुग्णालयांमध्ये उपचारार्थ हलविले. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात बारा रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर उर्वरित चार गंभीर रुग्णांवर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार केले जात आहे.
सुटीवरील डॉक्टरांना पाचारण
रविवारची सुटी असल्यामुळे जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय मनुष्यबळ कमी होते; मात्र अपघाताची माहिती मिळताच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी सुटीवरील डॉक्टरांना तत्काळ हजर होण्यास सांगितले. अस्थिरोग तज्ज्ञांसह अन्य आठ ते दहा डॉक्टरांचे पथक व परिचारिकांचा चमू सज्ज ठेवण्यात आला. रुग्णालयात रुग्णवाहिकांमधून दाखल रुग्णांचे प्रमाण लक्षात घेता दोन स्ट्रेचर अपुरे पडले. यावेळी काही रुग्णांना अन्य रुग्णांच्या नातेवाइकांनी मदत करत दाखल केले. अत्यल्प स्ट्रेचर होते. यामुळे रुग्णांचे हाल झाले. आपत्कालीन परिस्थिती ‘बॅकअप’ देणारा अन्य मनुष्यबळही सज्ज ठेवणे गरजेचे होते, असे नागरिकांनी सांगितले.