पवार यांच्या घरावर हल्ला प्रकरणात पेठचे तीन कर्मचारी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2022 01:34 AM2022-05-04T01:34:03+5:302022-05-04T01:34:31+5:30
राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानावर हल्ला केल्याप्रकरणी राज्यभरातील ११५ कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल असल्याने त्यांना अद्यापही सामावून घेण्यात आलेले नाही. त्यामध्ये नाशिकमधील पेठ आगारातील तीन कर्मचाऱ्यांचादेखील समावेश असल्याचे समजते. नाशिक विभागात एकीकडे सर्व कर्मचारी परतले असताना या तीन कर्मचाऱ्यांबाबत अद्यापही निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला आहे.
नाशिक : राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानावर हल्ला केल्याप्रकरणी राज्यभरातील ११५ कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल असल्याने त्यांना अद्यापही सामावून घेण्यात आलेले नाही. त्यामध्ये नाशिकमधील पेठ आगारातील तीन कर्मचाऱ्यांचादेखील समावेश असल्याचे समजते. नाशिक विभागात एकीकडे सर्व कर्मचारी परतले असताना या तीन कर्मचाऱ्यांबाबत अद्यापही निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला आहे.
मागील महिन्यात मुंबईत आंदोलनातील एस.टी. कर्मचाऱ्यांनी ९ एप्रिल रोजी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवास्थानाच्या आवारात घुसून हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. संपूर्ण राज्यात या घटनेविषयीच्या प्रतिक्रिया उमटल्या, तर या घटनेची गंभीर दखल घेत पेालिसांनी ११५ जणांवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करीत त्यांना न्यायालयापुढे हजर केले होते. या सर्वांची जामिनावर सुटका झालेली असली तरी त्यांना सेवेत घेण्याबाबतचा निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला आहे. वास्तविक परिवहनमंत्री अनिल परब यांनी यापूर्वीच या कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे त्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
जेंव्हा एस.टी. कर्मचाऱ्यांचे मुंबईतील अझाद मैदानात आंदोलन सुरू होते तेव्हा या आंदोलनात राज्यभरातील एस.टी. कर्मचारी सहभागी झाले होते. नाशिकमधूनदेखील अनेक कर्मचारी आंदोलनात सहभागी होण्यासाठी गेलेले होते. न्यायालयाच्या निर्णयानंतर काही कर्मचारी नाशिकला परतले, तर काही कर्मचारी मुंबईतच थांबलेले होेते. दि. ९ एप्रिल रोजी यातील काही एस.टी. कर्मचारी थेट पवार यांच्या निवासस्थानावर पोहोचले. त्यामध्ये नाशिकमधील पेठ आगाराचे तीन कर्मचारी असल्याचे सांगितले जाते. त्यामध्ये दोन कर्मचारी हे बडतर्फ, तर एका कर्मचाऱ्यांला नोटीस बजविण्यात आलेली आहे. एस.टी.चे इतर सर्व कर्मचारी कामावर परतलेले असताना या तीन कर्मचाऱ्यांवरील निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला आहे.
--इन्फो--
निर्णय विरिष्ठ कार्यालयावर अवलंबून
राज्य परिवहन महामंडळाचे सर्व कर्मचारी कामावर रुजू झाले असून, त्यांची सेवा पुनर्स्थापित करण्यात आलेली आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या संसाराची गाडीदेखील रुळावर आलेली आहे. जे कर्मचारी अद्यापही अपील दाखल करू शकलेले नाहीत त्यांच्या बाबतीतील निर्णय राज्य परिवहन महामंडळ मुख्यालयातून घेतला जाणार असल्याचे समजते.