तीन पिस्तूल, ११ काडतुसे अन् ३५ शस्त्रे हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:41 AM2020-12-11T04:41:20+5:302020-12-11T04:41:20+5:30
शहरात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. वाहनचोरी, जबरी लूट, ...
शहरात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. वाहनचोरी, जबरी लूट, घरफोड्यांसारखे गुन्हे सातत्याने घडू लागल्याने पाण्डेय यांनी उपायुक्त, सहायक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावून तातडीने शहरातील सराईत गुन्हेगारांच्या घरांची झाडाझडती घेण्याचे फर्मान सोडले. यानुसार उपआयुक्त, सहायक आयुक्तांसह ४० पोलीस निरीक्षक, ८५ सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक, ५४३ अंमलदार, १२० महिला पोलिसांनी माेर्चा हाती घेत एकाचवेळी सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत झाडाझडती सुरू केली.
परिमंडळ-१मधील पंचवटी पोलीस ठाण्यात २ तलवारी, ३ कोयते, २ चॉपर, सुरा, फायटर अशी ९ शस्त्रे तर मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीत ३ तलवारी, ३ कोयते, चॉपर, सुरा अशी ८ हत्यारे मिळून आली. उपनगर हद्दीत देशी पिस्तूल, एक तलवार, कोयता अशी हत्यारे आढळून आली. या प्रकरणी २४ गुन्हे दाखल करण्यात आले. अंबड पोलीस ठाणे हद्दीत संशयित आरोपी दर्शन उत्तम दोंदे (रा. राजवाडा, कामटवाडे) याच्याकडे गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे आणि उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील जयभवानी रोडवरील स्वप्नील सोसायटीत राहणारा राहुल संदीप सोनवणे याच्या कब्जातूनही १ गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले. त्यांना पोलिसांनी अटक करून त्यांच्यावर विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---इन्फो--
शस्त्रांची अशीही लपवाछपवी,,,
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या अधारे हिरावाडी येथील संशयित सूरज विक्रम परदेशी याच्या घराची झडती घेण्यात आली. मात्र, त्याच्या राहत्या घरात कुठलेही शस्त्र मिळाले नाही. परदेशी यास पोलिसांनी पोलीस ठाण्यात आणून खाकीचा हिसका दाखविला असता त्याने कबुली देत त्याच्या मावशीच्या घरी कमल नगरमधील गोकुळधाम सोसायटीत गावठी पिस्तूल व ९ जिवंत काडतुसे लपवून ठेवल्याची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ छापा टाकून ते जप्त केले. त्याच्याविरुद्ध पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
--
फोटो आर वर १०पोलीस नावाने