हरकतींवर सुनावणीसाठी तिघांची नियोजन समिती
By admin | Published: August 4, 2015 12:14 AM2015-08-04T00:14:42+5:302015-08-04T00:16:04+5:30
प्रारूप विकास आराखडा : १९२० हरकती दाखल
नाशिकरोड : प्रारूप शहर विकास आराखड्याबाबत सोमवारी शेवटच्या दिवशी सुमारे १९२० हरकती व सूचना दाखल झाल्या आहेत. या हरकती व सूचनांवर सुनावणी व निर्णय घेण्यासाठी तीन जणांची नियोजन समिती नेमण्यात आली आहे.
नगररचना विभागाच्या सुलेखा वैजापूरकर या तयार करीत असलेला प्रारूप शहर विकास आराखडा हा जाहीर होण्यापूर्वीच फुटल्याने मोठे वादंग निर्माण झाले होते. यामुळे नगररचना विभागाचे सहायक संचालक प्रकाश भुक्ते यांना नव्याने प्रारूप शहर विकास आराखडा करण्यासाठी नेमण्यात आले होते. वर्षभरानंतर भुक्ते यांनी गेल्या २३ मे रोजी प्रारूप शहर विकास आराखडा जाहीर केला.
नियोजन समिती
प्रारूप शहर विकास आराखड्याबाबत दाखल झालेल्या हरकती-सूचनांवर सुनावणी करून निकाल देण्यासाठी तीन जणांची नियोजन समिती नियुक्त करण्यात आली आहे. दोन महिन्यांच्या कालावधीत हरकती-सूचनांवर सुनावणी व निर्णय घेऊन तो अहवाल नियोजन समितीला सहायक संचालक प्रकाश भुक्ते यांना सादर करावयाचा आहे. त्या अहवालाबाबत भुक्ते आपला अभिप्राय देऊन शहराचा विकास आराखडा शासनाला सादर करतील. (प्रतिनिधी)