उपनिरीक्षकासह तीन पोलीस निलंबित
By admin | Published: December 22, 2016 12:36 AM2016-12-22T00:36:43+5:302016-12-22T00:36:57+5:30
घोटी : व्यापाऱ्याकडून दहा लाख रु पये जबरीने काढल्याचे निष्पन्न
घोटी : इगतपुरी तालुक्यातील एका महाविद्यालयात एम.बी.बी.एस.चे प्रवेशशुल्क भरण्यासाठी आलेल्या दिल्ली येथील व्यापाऱ्याकडील दहा लाख रुपयांची रोकड जबरीने काढून घेतल्याचे विभागीय चौकशीत निष्पन्न झाल्याने पोलीस उपनिरीक्षकासह तीन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. दिल्ली येथील व्यापारी सुमनकुमार प्रामाणिक हे दि. १४ नोव्हेंबर रोजी नाशिक येथून भाडेतत्त्वावर वाहन घेऊन घोटीमार्गे वैद्यकीय महाविद्यालयात पाल्याच्या एम.बी.बी.एस.च्या प्रवेशासाठी १६ लाख रुपयांची रक्कम घेऊन जात होते. त्यांच्या वाहनावरील चालक प्रशांत पाळदे यांनी घोटी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी राम ज्ञानेश्वर निसाळ यांना या मार्गावरून मोठ्या प्रमाणात नोटा जात असल्याची माहिती दिली होती. त्याची खात्री करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक गणेश शेळके, हवालदार वसंत पगारे, पोलीस शिपाई प्रशांत गवळी, राम निसाळ यांनी देवळे पुलाजवळ प्रामाणिक यांचे वाहन अडवित व्यापाऱ्याला निर्जनस्थळी नेऊन त्याच्या जवळील सोळा लाखातील दहा लाखाची रक्कम बळजबरीने काढून घेतल्याचा आरोप आहे. (वार्ताहर)