त्र्यंबकच्या शिवलिंगावरील बर्फाची करामत पुजाऱ्यांच्या अंगलट; व्हायरल सत्य समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 06:25 AM2023-02-10T06:25:39+5:302023-02-10T06:27:04+5:30
हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून पिंडीत बर्फ होऊच शकत नसल्याचा निर्वाळा दिला. समितीच्या अहवालानुसार, देवस्थानातील तुंगार मंडळातील तिघा पुजाऱ्यांनीच शिवलिंगात बर्फ टाकत त्याचा व्हिडीओ व्हायरल केल्याचे समोर आले.
नाशिक : बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वराच्या शिवलिंगात बर्फ जमा झाल्याने जणू बाबा अमरनाथच अवतरल्याची चर्चा सुरू झाली. कुणी चमत्काराचा दावा केला, तर कुणी ईशान्य भारतावर ही संकटाची चाहूल असल्याची साठा उत्तराची कहाणी ऐकविली. व्हायरल व्हिडीओने विज्ञानवादी चक्रावले. अंनिसही पुढे सरसावली. अखेर चौकशी समितीतून सात महिन्यांनंतर व्हायरल सत्य समोर आले असून, देवस्थानातील तीन पुजाऱ्यांनीच हा सारा बनाव रचल्याचे उघड झाले आहे. तिघा पुजाऱ्यांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्र्यंबकराजाच्या पिंडीत ३० जून २०२२ रोजी बर्फ झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. जून महिन्यात पिंडीत बर्फ झालाच कसा, असा सवालही उपस्थित होऊ लागला. मात्र, विज्ञान अभ्यासकांनी हा दावा खोडून काढला तर महाराष्ट्र अंनिसने सत्यशोधनाची मागणी केली होती. देवस्थानने सत्यशोधनासाठी विश्वस्तांची चौकशी समिती नेमली. समितीने सीसीटीव्ही फुटेज तपासले तसेच हवामान खात्याचाही अहवाल मागविला.
त्यांनीच बर्फ टाकला, व्हिडीओ व्हायरल केला
- हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून पिंडीत बर्फ होऊच शकत नसल्याचा निर्वाळा दिला. समितीच्या अहवालानुसार, देवस्थानातील तुंगार मंडळातील तिघा पुजाऱ्यांनीच शिवलिंगात बर्फ टाकत त्याचा व्हिडीओ व्हायरल केल्याचे समोर आले.
-जाधव यांनी पोलिस ठाण्यात संशयित पुजारी सुशांत तुंगार, आकाश तुंगार व उल्हास तुंगारविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.
यामुळे देवस्थानच्या कीर्तीला बाधा पोहोचते. देवस्थानच्या एका घटकांकडून ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिराचा नावलौकिक खराब होणे, ही बाब दुर्दैवी आहे.
- प्रशांत गायधनी, विश्वस्त, त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट
हा भाविकांच्या श्रद्धेशी केलेला खेळ आहे. गुन्हा नोंद व्हायला आठ महिने का लागले? याची चौकशी होणे गरजेचे आहे. शिवाय जादूटोणाविरोधी कायद्याचे कलम लावण्याची विनंती पोलिस प्रशासनाला करण्यात येत आहे.
- कृष्णा चांदगुडे, राज्य कार्यवाह, महाराष्ट्र अंनिस