संगमनेर दरोड्यातील तिघे जेरबंद : गुन्हे शाखेचा सापळा
By admin | Published: May 25, 2017 09:50 PM2017-05-25T21:50:16+5:302017-05-25T21:50:16+5:30
या तिघांच्या गुन्हे शाखेच्या युनिट-२ पथकाने नाशिकरोड भागात मुसक्या आवळल्या आहेत.
संगमनेर येथील एका पेट्रोलपंपावर गावठी पिस्तूलचा धाक दाखवून सुमारे सात लाख १८ हजाराची रोकड लुटीच्या दरोड्यामधील तिघे संशयित फरार होते. या तिघांच्या गुन्हे शाखेच्या युनिट-२ पथकाने नाशिकरोड भागात मुसक्या आवळल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलीस शिपाई बाळा नांद्रे यांना गुप्त बातमीदाराकडून तीन इसम उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत देशी बनावटीचे पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या भागात गुन्हे शाखेच्या संपूर्ण पथकाने सापळा रचला. दरम्यान, तीन संशयित इसम या भागात फिरताना आढळून आले. ते एका पल्सर दुचाकीवरून या भागात येऊन पिस्तूल खरेदी करणाऱ्या ग्राहकाच्या प्रतीक्षेत होते. याचवेळी पथकाला खात्री पटल्यानंतर तिघांना शिताफीने अटक करण्यात आली. त्यांची अंगझडती घेतली असता देशी बनावटीचे पिस्तूल, मॅक्झीन व गुन्ह्यात वापरलेली एक पल्सर मोटारसायकल असा एकूण एक लाख दहा हजाराचा मुद्देमाल आढळून आला. पोलिसांनी या तिघांविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. संशयित आरोपी महेश चिंधू ऊर्फ चिंतामण आंधळे (२३, रा. चेहेडी), महेश पांडुरंग लांडगे (२२, रा. वडगाव पिंगळा), सुमित अविनाश निरभवणे (२२, नाशिकरोड) यांची पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्यांनी काही साथीदारांच्या मदतीने पंधरा दिवसांपूर्वी संगमनेर येथील एका पेट्रोलपंपावर दरोडा टाकल्याची कबुली दिली आहे