दसाणे येथे वाळूचे तीन ट्रॅक्टर जप्त
By admin | Published: March 9, 2016 10:47 PM2016-03-09T22:47:40+5:302016-03-09T22:49:19+5:30
दसाणे येथे वाळूचे तीन ट्रॅक्टर जप्त
बागलाण : पोलिसांची कारवाईसटाणा : बागलाण तालुक्यात वाळूमाफियांनी पुन्हा डोके वर काढले असून, बागलाणच्या पश्चिम पट्ट्यातील दसाणे गावाच्या कान्हेरी नदीत मंगळवारी मध्यरात्री तीन वाळूचे ट्रॅक्टर पोलिसांनी पकडल्याने खळबळ उडाली आहे.
महसूल विभागाची खरी जबाबदारी असलेल्या अवैध वाळू उत्खननाबाबत सटाणा महसूल विभाग उदासीन असताना सटाणा पोलिसांनी मागील महिन्यापासून वाळूमाफियांच्या चांगल्याच मुसक्या आवळल्या आहेत. इकडे सटाणा पोलीस ठाण्यात दिवसाआड पोलिसांची वाळू उपसा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची यशस्वी कारवाई सुरू असली तरी, जायखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतही खुलेआम वाळू उपसा सुरूच असल्याने या पोलिसांचे हात वाळूने ओले झाल्याची चर्चा आहे.
दोन दिवसांपूर्वी लखमापूर येथे दोन वाळूचे ट्रॅक्टर पोलिसांनी जप्त करून गुन्हे दाखल केले असताना आज पुन्हा दसाणे येथील कान्हेरी नदी पात्रात तब्बल तीन ट्रॅक्टर वाळू उपसा करताना आढळून आल्याने पोलिसांनी तिघांवर गुन्हे दाखल करून मुद्देमाल जप्त केला आहे. हरी वसंत सोनवणे, मधुकर शंकर अहिरे व अनिल कडू सोनवणे, सर्व रा.दसाणे अशी या वाळूमाफियांची नावे असून, त्यांच्याकडून अनक्रमे फार्म ट्रेक कंपनीचा एमएच ४१ डी २१२८, एमएच ४१ डी ८८११ व बिगर नंबर ट्रॅक्टर असे तीन ट्रॅक्टर जोडलेल्या तीन ट्रॉल्यांसह वाळू भरलेल्या अवस्थेत पोलिसांनी जप्त करून गुन्हे दाखल केले आहेत.