तीन विभागांत भाजपाचे होणार प्रभाग सभापती
By admin | Published: March 4, 2017 01:17 AM2017-03-04T01:17:12+5:302017-03-04T01:17:23+5:30
नाशिक : महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजाच्या सोईसाठी विभागांमधील काही प्रभागांची फेररचना करण्यात आल्याने राजकीय समीकरणेही बदलणार असून, भाजपाकडे तीन विभागांचे प्रभाग सभापतिपद जाणार आहे
नाशिक : महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजाच्या सोईसाठी विभागांमधील काही प्रभागांची फेररचना करण्यात आल्याने राजकीय समीकरणेही बदलणार असून, भाजपाकडे तीन विभागांचे प्रभाग सभापतिपद जाणार आहे. नाशिक पश्चिम विभागात कॉँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसे आघाडीला, तर सिडको विभागात शिवसेनेकडे बहुमत असल्याने त्याठिकाणी त्यांचाच प्रभाग सभापती बसणार, हे स्पष्ट आहे. सातपूर विभागात मात्र मनसे व रिपाइंच्या भूमिकेवर सभापतिपद अवलंबून असणार आहे.
महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजाच्या सोईसाठी विभागातील काही प्रभागांची फेररचना करण्यात आली आहे. त्यात नाशिक पूर्व मधील प्रभाग क्रमांक १३ हा पश्चिम विभागाला, नाशिक पश्चिममधील प्रभाग २४ हा सिडकोला, तर सिडकोतील प्रभाग २६ हा सातपूर विभागाला जोडण्यात आला आहे. या फेररचनेमुळे प्रभाग समित्यांवरील राजकीय समीकरणेही बदलणार आहेत. पंचवटी विभागात १ ते ६ प्रभाग आहेत. याठिकाणी २४ पैकी भाजपा - १९, शिवसेना - १, मनसे - २ आणि अपक्ष - २ असे पक्षीय बलाबल आहे. भाजपाचे निर्विवाद बहुमत असल्याने याठिकाणी भाजपाचाच प्रभाग सभापती विराजमान होईल. नाशिक पश्चिममध्ये प्रभाग ७, १२ आणि १३ असे तीन प्रभाग आहेत. याठिकाणी १२ पैकी भाजपा ५, शिवसेना - १, राष्ट्रवादी - १, कॉँग्रेस - ४, तर मनसे-१ असे पक्षीय बलाबल आहे. येथे कॉँग्रेस-राष्ट्रवादी आणि मनसेने निवडणूकपूर्व आघाडी केली असल्याने त्यांचाच प्रभाग सभापती होईल. सेनेने भाजपाला साथ दिली तर समसमान बल होऊन चिठ्ठी पद्धतीने सभापतिपदाची सोडत काढावी लागणार आहे. सिडको विभागात प्रभाग २४, २५, २७, २८, २९ आणि ३१ याप्रमाणे सहा प्रभाग आहेत. याठिकाणी २४ पैकी भाजपा-९, शिवसेना-१४, राष्ट्रवादी-१ असे पक्षीय बलाबल आहे. येथे शिवसेनेचे पूर्ण बहुमत असल्याने सेनेचाच प्रभाग सभापती विराजमान होणार आहे. नाशिक पूर्व विभागात प्रभाग १४, १५, १६, २३ आणि ३० असे पाच प्रभाग आहेत. याठिकाणी भाजपा-१२, कॉँग्रेस-२, राष्ट्रवादी-४ आणि अपक्ष-१ असे बलाबल आहे. याठिकाणी भाजपाचे पूर्ण बहुमत असल्याने भाजपाचा प्रभाग सभापती होणार आहे.
नाशिकरोड विभागात प्रभाग १७ ते २२ असे सहा प्रभाग आहेत. याठिकाणी भाजपा-१२, शिवसेना-११ असे बलाबल आहे. येथे भाजपा एका संख्येने पुढे असल्याने भाजपाचा प्रभाग सभापती बसणार आहे. सहा पैकी तीन ठिकाणी भाजपाचा प्रभाग सभापती होण्याची शक्यता आहे.