शेजवळ खून प्रकरण तिघा संशयितांना शिर्डीहून अटक
By admin | Published: January 25, 2017 12:33 AM2017-01-25T00:33:30+5:302017-01-25T00:33:46+5:30
नियोजनबद्धरीत्या खुनाचा बदला : इतर फरार संशयितांचा पोलिसांकडून शोध सुरू
नाशिक : जेलरोड परिसरातील सुरेंद्र सिद्धार्थ शेजवळ ऊर्फ घाऱ्या या शिवसेनेच्या इच्छुक उमेदवाराच्या खून प्रकरणातील तिघा संशयितांना नाशिक पोलिसांनी मंगळवारी (दि़ २४) शिर्डीजवळील देर्डे फाट्यावर अटक केली़ दरम्यान, हा खून पूर्ववैमनस्यातून झाला असून, यामागे राजकीय कारण नसल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंघल यांनी दिली़ शुक्रवारी (दि़ २०) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास शेजवळ व त्याचा मित्र विक्र म पोरजे हे अॅक्टिवा दुचाकीने घरी जात होते़ संशयित अनिल सखाराम डिग्रसकर ऊर्फ बाळा (रा़ संजय गांधीनगर, जेलरोड), रामभाऊ किसन चव्हाण (रा़ संकल्प सोसायटी, कोणार्कनगर), राहुल देवराम गोतरणे (रा़ गुरुनमन रो हाउस, राजराजेश्वरीजवळ, जेलरोड) व त्यांचे साथीदार यांनी शेजवळ याच्यावर तलवार व कोयत्याने वार करून शेजवळचा खून केला व फरार झाले होते़ या खुनाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केल्यानंतर शहरातील तिन्ही युनिट व नाशिकरोड पोलीस ठाण्याचे अधिकारी संशयितांच्या मागावर होते़ त्यातच नाशिकरोडच्या पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील पोलीस नाईक प्रकाश आरोटे यांना गुन्ह्यातील इस्टीम कार व संशयित हे शिर्डी परिसरात असल्याची माहिती मिळाली होती़ त्यांनी ही माहिती वरिष्ठांना दिल्यानंतर स्वतंत्र टीम तयार करण्यात आली़ सहायक पोलीस निरीक्षक मंगेश मजगर, आरोटे, कॉन्स्टेबल वाटाणे व पथकाने शिर्डी परिसरात शोध घेऊन कारसह या तिघा संशयितांना अटक केली़