घोटीत सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2020 11:26 PM2020-04-08T23:26:17+5:302020-04-08T23:26:57+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असतानाच इगतपुरी तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या घोटी शहरात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला दिसून येत आहे. बँकांसमोर दोन दिवसांपासून प्रचंड गर्दी दिसत आहे. तसेच भाजीपाला विक्रेते व नागरिकांकडून गर्दीमुळे प्रशासनाने काही उपाययोजना केल्या आहेत की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.
घोटी : कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असतानाच इगतपुरी तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या घोटी शहरात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला दिसून येत आहे. बँकांसमोर दोन दिवसांपासून प्रचंड गर्दी दिसत आहे. तसेच भाजीपाला विक्रेते व नागरिकांकडून गर्दीमुळे प्रशासनाने काही उपाययोजना केल्या आहेत की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असून तसेच प्रशासन वेळोवेळी उपाययोजना आखूनसुद्धा घोटी शहरात दररोज सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला दिसत आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील ठाणे व नाशिक जिल्ह्याचे प्रवेशद्वार इगतपुरीतील घाटनदेवी आहे. या ठिकाणी जिल्हा हद्दबंदी सुरक्षा पथक तैनात असूनही प्रशासनाची नजर चुकवून या ठिकाणाहून दररोज मुंबईवरून नाशिककडे येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने ठोस भूमिका घेऊन कडक उपाययोजना राबविण्यात याव्यात, अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे.
घोटी शहरात भाजीपाला विक्री मेनरोड येथे होत असून, या ठिकाणी दररोज यात्रेचे स्वरूप बघायला मिळते. तसेच शहरातील सर्व बँकांमध्ये प्रचंड गर्दी झाली असून, या ठिकाणी कुठल्याही बँक व्यवस्थापनाकडून सोशल डिस्टन्सिंगच्या उपाययोजना राबविल्या गेल्या नसल्याने स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
बँकामध्ये पेन्शनधारक मोठ्या प्रमाणात असल्याने ग्रामीण भागातून येणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने बँक व्यवस्थापनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष उपाययोजना करण्यात येत असल्याचे पेन्शनधारकांच्या वतीने व्यक्त होत आहे.