बिहारमध्ये जाणाऱ्या तीन रेल्वे गाड्या रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2022 01:48 AM2022-06-20T01:48:08+5:302022-06-20T01:48:25+5:30
केंद्र सरकारने लष्कर भरतीसाठी जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेविरोधात देशात काही ठिकाणी युवकांकडून विरोध होत आहे. रेल रोको केला जात आहे. त्यामुळे रविवारी दुसऱ्या दिवशीही रेल्वे वेळापत्रकावर परिणाम होऊन बिहारला जाणाऱ्या व येणाऱ्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या. तर काही विलंबाने धावत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
नाशिक रोड : केंद्र सरकारने लष्कर भरतीसाठी जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेविरोधात देशात काही ठिकाणी युवकांकडून विरोध होत आहे. रेल रोको केला जात आहे. त्यामुळे रविवारी दुसऱ्या दिवशीही रेल्वे वेळापत्रकावर परिणाम होऊन बिहारला जाणाऱ्या व येणाऱ्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या. तर काही विलंबाने धावत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. बिहारवरून येणारी पाटलीपुत्र, पटणा-वास्को, पवन या तीन गाड्या रविवारी रद्द करण्यात आल्या. मुंबईहून बिहारला जाणारी भागलपूर, पवन, जनता एक्स्प्रेस, स्पेशल हॉलिडे या गाड्या रद्द करण्यात आल्या. बिहारवरून येणारी महानगरी एक्स्प्रेस चार तास, गोदान तीन तास उशिराने धावली. काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. नाशिक रोड मार्गे मुंबईला जाणाऱ्या आणि मुंबईहून उत्तर भारतात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना आंदोलनाचा फटका प्रामुख्याने बसत आहे. बिहारमधील पाटलीपुत्र आणि भागलपूर येथून मुंबईला रवाना होणाऱ्या प्रवासी रेल्वे गाड्या उत्तर भारतातील आंदोलनामुळे शनिवारी रद्द करण्यात आल्या होत्या. अग्निपथ योजनेच्या विरोधात आंदोलन असेच सुरू राहिले तर रेल्वेचे वेळापत्रक कोलमडून पडू शकते. आंदोलन आणखीन किती काळ सुरू राहणार हे स्पष्ट होत नसल्यामुळे रेल्वे वेळापत्रकाबाबतही अनिश्चितता आहे. उत्तर भारतात जाणाऱ्या-येणाऱ्या रेल्वे ऐनवेळी रद्द करण्यात आल्याने तसेच येणाऱ्या-जाणाऱ्या रेल्वे या उशिराने धावत असल्याने रेल्वे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.