नाशिकच्या चांदशी गावातील रस्त्याचे तीनतेरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 12:13 PM2018-04-06T12:13:57+5:302018-04-06T12:13:57+5:30
मोठमोठे खड्डे व खराब रस्त्यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले
गंगापूर- नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीला लागून असलेल्या हाकेच्या अंतरावर चांदशी गाव असून मोठमोठे खड्डे व खराब रस्त्यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहे. या परिसरात मोठमोठ्या शैक्षणिक संस्थेच्या शाळा असून विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी यांनाही या रस्त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली असून , रस्त्यावर जागोजागी मोठ मोठे खड्डे पडले आहे. नागरिकांना अधूनमधून छोट्या मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागत आहे. मागील काही दिवसांपूर्वी या रस्त्यावरून जातांना एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. असे असतांनाही निर्ढावलेल्या बांधकाम विभागाला त्याचे काही सोयरे सुतक नाही. नागरिकांनी वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलने करून बघितले परंतु त्याचा काहीही परिणाम अद्याप पावेतो जाणवत नसल्याचे दिसते. शासनाचा कोट्यवधी निधी निरर्थक कामांसाठी खर्च होत असतो मात्र या छोट्या आणि गरजेच्या गोष्टींकडे लक्ष देण्यासाठी संबधितांकडे वेळ व पैसा नसल्याने ग्रमस्थ संतप्त झाले आहे. परिसरातील विद्यार्थ्यांना व वृद्ध नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. शासन अजून किती जणांचा बळी गेल्यावर या रस्त्याची दुरुस्ती करेल असा सवाल आता सामान्य नागरिकांना पडला आहे.