दरोड्याच्या तयारीतील तिघे गजाआड तर दोघे फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2021 01:52 AM2021-10-14T01:52:40+5:302021-10-14T01:53:50+5:30
दिंडोरी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात पहाटेच्या सुमारास दरोडा टाकण्याच्या इराद्याने दबा धरून बसलेल्या दरोडेखोरांच्या टोळीतील तिघांना पंचवटी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे तर दोघेजण फरार झाले आहे
पंचवटी : दिंडोरी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात पहाटेच्या सुमारास दरोडा टाकण्याच्या इराद्याने दबा धरून बसलेल्या दरोडेखोरांच्या टोळीतील तिघांना पंचवटी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे तर दोघेजण फरार झाले आहे पोलिसांनी या संशयित दरोडेखोरांकडून मिरचीपूड दोरी कोयता तसेच इतर धारदार शस्त्रे जप्त केले आहेत. मंगळवारी पहाटे पंचवटी पोलिसांनी ही कामगिरी केली आहे.
पंचवटी पोलिसांनी दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील संशयित सागर विठ्ठल जाधव (रा. त्रिमूर्तीनगर, सिडको), कुणाल विजय थोरात (एरंडवाडी, पेठरोड), अजय भाऊसाहेब माळेकर (राहुलवाडी) आदींना बेड्या ठोकल्या आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांच्या आदेशानुसार पोलीस कर्मचारी पहाटेच्या सुमाराला बाजार समिती परिसरात गस्त घालत असताना संशयित आरोपी कुणाल थोरात अजय माळेकर सागर जाधव व त्यांचे दोन साथीदार असे पाच जण बाजार समितीत प्रमोद व्हेजिटेबल कंपनीसमोर संशयास्पद आढळून आले पोलिसांनी त्यांना हटकले असता त्यांनी पोलिसांना बघताच पळ काढला पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे धारदार कोयता, नायलॉन दोरी, मिरची पूड तसेच लोखंडी रॉड असे दरोडा टाकण्याचे साधन साहित्य मिळून आले पोलिसांनी तिघांना अटक करून गुन्ह्यात वापरलेली (एमए.१५ एचएल ३२३६) जप्त केली आहे.