तीन वर्षीय मुलाचा हौदात बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 12:55 AM2019-09-30T00:55:04+5:302019-09-30T00:55:29+5:30
विहितगाव येथील महाराजा बसस्थानकाच्या पाठीमागे असलेल्या कृपासिंधू बंगल्याच्या आवारात खेळताना अचानकपणे येथील पाण्याच्या हौदात पडून वाघ कुटुंबातील एकुलत्या एक तीन वर्षांच्या चिमुकल्या आराध्यचा दुर्दैवी मृत्यू झाला.
नाशिकरोड : विहितगाव येथील महाराजा बसस्थानकाच्या पाठीमागे असलेल्या कृपासिंधू बंगल्याच्या आवारात खेळताना अचानकपणे येथील पाण्याच्या हौदात पडून वाघ कुटुंबातील एकुलत्या एक तीन वर्षांच्या चिमुकल्या आराध्यचा दुर्दैवी मृत्यू झाला. रविवारी (दि.२९) दुपारच्या सुमारास उघडकीस आलेल्या या हृदयद्रावक घटनेने विहितगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत उपनगर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, एलआयसी मुंबईच्या शाखेत अधिकारीपदावर नोकरीस असलेले सचिन वाघ हे आपल्या कुटुंबीयांसमवेत विहितगाव येथील त्यांच्या कृपासिंधू बंगल्यात वास्तव्यास आहेत. रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास त्यांचा मुलगा आराध्य हा बंगल्याच्या परिसरात खेळत होता. बराच वेळ होऊनदेखील आराध्य घरात आला नाही, म्हणून त्याच्या आईसह कुटुंबीयांनी सर्वत्र शोधाशोध सुरू केली. सुमारे तासभर त्याचा शोध घेऊनदेखील आराध्य आढळून न आल्याने कुटुंबीय घाबरले. यावेळी बंगल्याच्या आवारात असलेल्या पाण्याच्या हौदाबाहेर त्याची खेळण्याची बासरी नजरेस पडली असता कुटुंबीयांनी हौदाजवळ जाऊन उघड्या झाकणातून आत डोकावून बघितले असता त्यामध्ये आराध्य असल्याचे त्यांना आढळले. तत्काळ त्याला हौदाबाहेर काढून बिटको रुग्णालयात हलविले, मात्र डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केल्याने वाघ कुटुंबीयांवर आभाळच कोसळले. या घटनेने वाघ कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
हौदाचे झाकण नादुरुस्त
बंगल्याच्या आवारात असलेल्या भूमिगत पाण्याच्या हौदावरील लोखंडी झाकण नादुरुस्त झाले होते. हे झाकण दुरुस्तीसाठी काढण्यात आल्याने हौद उघडा होता. खेळतांना आराध्य दुर्दैवाने हौदात पडल्याने मरण पावल्याचे समजते.