तीन वर्षाच्या चिमुकल्याचा पाण्याच्या हौदात बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2019 09:45 PM2019-09-29T21:45:15+5:302019-09-29T21:46:01+5:30
सुमारे तासभर त्याचा शोध घेऊनदेखील आराध्य मिळून न आल्याने कुटुंबिय घाबरले. यावेळी बंगल्याच्या आवारात असलेल्या पाण्याच्या हौदाबाहेर त्याची खेळण्याची बांसरी नजरेस पडली...
नाशिक : विहितगाव येथील महाराजा बसस्थानकाच्या पाठीमागे असलेल्या कृपासिंधू बंगल्याच्या आवारात खेळताना अचानकपणे येथील पाण्याच्या हौदात पडून वाघ कुटुंबाचा एकुलता एक तीन वर्षाचा चिमुकला आराध्यचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. रविवारी (दि.२९) दुपारच्या सुमारास उघडकीस आलेल्या या हृदयद्रावक घटनेने संपुर्ण विहितगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाब उपनगर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, एलआयसी मुंबईच्या शाखेत अधिकारीपदावर नोकरीस असलेले सचिन वाघ हे आपल्या कुटुंबियांसमवेत विहितगाव येथील त्यांच्या कृपासिंधू बंगल्यात वास्तव्यास आहे. रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास त्यांचा चिमुकला मुलगा आराध्य हा बंगल्याच्या परिसरात खेळत होता. बराच वेळ होऊनदेखील आराध्य घरात आला नाही, तसेच बंगल्याबाहेरही नजरेस पडला नाही, म्हणून त्याच्या आईसह कुटुंबियांनी सर्वत्र शोधाशोध सुरू केली. सुमारे तासभर त्याचा शोध घेऊनदेखील आराध्य मिळून न आल्याने कुटुंबिय घाबरले. यावेळी बंगल्याच्या आवारात असलेल्या पाण्याच्या हौदाबाहेर त्याची खेळण्याची बांसरी नजरेस पडली असता कुटुंबियांनी हौदाजवळ जाऊन उघड्या झाकणातून आत डोकावून बघितल असता त्यामध्ये आराध्य असल्याचे त्यांना आढळले. तत्काळ आराध्यला आजुबाजुच्या नागरिकांच्या मदतीने हौदाबाहेर काढून जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखविले; मात्र डॉक्टरांनी त्याचा उपचारापुर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेने वाघ कुटुंबियांवर आभाळ फाटले असून आराध्यच्या आईवडिलांसह सर्वच कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. याप्रकरणी उपनगर पोलिसांनी पंचनामा क रून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत