इगतुपरी तालुक्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंगप्रकरणी संशयिताला तीन वर्षांचा कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 08:18 PM2018-02-15T20:18:47+5:302018-02-15T20:22:25+5:30
इगतपुरी पोलीस ठाण्यात काशीनाथविरुद्ध बालकाचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यान्वये (पोस्को) गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नाशिक : सगतपुरी तालुक्यातील काळुस्ते गावातील संशयित काशीनाथ सारुक्ते याने बालिकेला वही दाखविण्याच्या बहाण्याने अश्लील छायाचित्रे दाखवून विनयभंग केल्याची घटना गेल्या वर्षी १९ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली होती. याप्रकरणी जिल्हा न्यायालयात खटला सुरू होता. या खटल्यावर गुरुवारी सुनावणी होऊन न्यायालयाने संशयित आरोपी काशीनाथ यास तीन वर्षांचा कारावास व पाच हजारांचा दंड ठोठावला.
इगतपुरी पोलीस ठाण्यात काशीनाथविरुद्ध बालकाचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यान्वये (पोस्को) गुन्हा दाखल करण्यात आला होता. वही दाखविण्याच्या बहाण्याने त्याने पीडित बालिकेला स्वत:च्या घरी नेऊन अश्लील छायाचित्रांचे पुस्तक दाखवून विनयभंग केला होता. सदर प्रकार जेव्हा पीडित बालिकेने घरी आल्यावर आईला सांगितला तेव्हा ही घटना उघडकीस आली. आईने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. त्यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत संशयित आरोपी व त्याच्याविरुद्ध साक्षीदारांनी दिलेली साक्ष व पुराव्यांच्या आधारे तीन वर्षांचा कारावासासह पाच हजार रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावली. सरकारपक्षाकडून अॅड. शिरीष कडवे यांनी कामकाज पाहिले. पीडित मुलीची साक्ष या निकालात महत्त्वाची ठरली. संशयित आरोपीने दंडाची रक्कम न भरल्यास तीन महिन्यांचा कारावास भोगावा लागणार आहे.