म्हसरूळला रंगला बैलगाडी शर्यतीचा थरार; अकरा वर्षांनंतर लागला मुहूर्त
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2023 10:01 AM2023-06-09T10:01:30+5:302023-06-09T10:02:04+5:30
पुणे, सातारा, सांगली, जळगाव येथील स्पर्धकांचा सहभाग
लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : सकाळपासून जमलेली गर्दी, लाडक्या सर्जा राजा सरसावलेले आणि गाडी मालकही ईरेला पेटलेले... स्पर्धा सुरू झाली आणि मालकाच्या आदेशासरशी बैलांनी प्राणपणाने पळण्यास सुरुवात झाली.... तब्बल अकरा वर्षानंतर बैलगाडी स्पर्धेचा हा थरार नाशिककरांना बोरगड परिसरात अनुभवायला मिळाला.
सर्वोच्च न्यायालयाने बैलगाड्यांच्या शर्यतील मान्यता दिल्याने मंगळवारी (दि. ६) या स्पर्धा बोरगडजवळील ठक्कर मैदानावर पर पडल्या. या ठिकाणी ग्रामस्थांच्या पुढाकारातून नेहमीच स्पर्धा होत असल्या तरी त्यावर बंदी आल्याने अकरा वर्षांपासून स्पर्धा बंद होत्या. आता सर्वोच्च न्यायालयाने मुभा दिल्याने म्हसरूळचे ग्रामस्थ आणि आमदार राहुल ढिकले यांच्या पुढाकाराने या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. स्पर्धेसाठी खास चार ट्रॅक तयार करण्यात आले हेाते. तसेच शर्यतींसाठी धावणाऱ्या जातीच्या बैलजोड्या आणण्यात आल्या होत्या. यात खिल्लारी, म्हैसूर, गावरान, निळा कोसा, कर्नाटकी, गावरान खिल्लार अशा अनेक जातींचे बैल स्पर्धेत उतरविण्यात आले हेाते. स्पर्धेसाठी खास पुणे, सातारा, सांगली, पुणे येथून खास स्पर्धक दाखल झाले होते. यावेळी विजेत्यांना बुलेट आणि अन्य पारितोषिके देऊन गौरवण्यात आले.
यावेळी आयोजक आमदार ॲड. राहुल ढिकले, स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गिते, माजी महापौर रंजना भानसी, म्हसरूळ पाेलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक साखरे, माजी गटनेता अरुण पवार, हेमंत शेट्टी, मुकेश शहाणे, दीपक निकम, सोमनाथ वडजे, राजेंद्र सातकर, रमेश बोरस्ते, वसंत मोराडे, राजेंद्र थोरात तसेच म्हसरूळ येथील ग्रामस्थ मेाठ्या संख्येने सहभागी झाली हाेते.
चुरशीची लढत झाली ‘टाय’
- बैलगाडी शर्यतीतील लढत टाय ठरली. बुलेट आणि ४१ हजार रुपये रोख असे बक्षीस देवीदास सानप, तिगाव, संगमनेर आणि बबलू शेठ फुलोरे कल्याण यांना विभागून देण्यात आले. तर स्प्लेंडर बाइक रामा शामा ग्रुप मखमलाबाद यांना देण्यात आली.
- दुसरी स्प्लेंडर बाइक दीपक गवळी, नारायण टेम्बी यांना तर तिसरी स्प्लेंडर बाइक मेजर ग्रुप दिंडोरी यांना देण्यात आली. पाचवे २१ हजार रुपयांचे पारितोषिक निफाड तालुक्यातील नैताळे गावास देण्यात आले.