नाशिकमध्ये पुन्हा बर्निंग बसचा थरार; एसटी बसने घेतला पेट, सर्व प्रवासी बचावले
By अझहर शेख | Published: October 8, 2022 01:10 PM2022-10-08T13:10:26+5:302022-10-08T13:42:55+5:30
नाशिकच्या वणी गडावर जाणाऱ्या या चालत्या बसने अचानक पेट घेतला. प्रवाशी वाहतूक करणाऱ्या बसला अचानक आग लागल्याने खळबळ माजली.
नाशिक - औरंगाबाद रोडवरील खासगी बसला लागलेल्या आगीची घटना ताजी असतानाच वणी येथे पुन्हा द बर्निंग बसचा थरार पाहायला मिळाला. सप्तशृंगी गडाकडे जाणारी राज्य परिवहन महामंडळाची लालपरी बसने अचानक पेट घेतला. काही कळण्याच्या आतच बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. सुदैवाने या बसमधील सर्व प्रवासी भाविक सुखरूप असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
नाशिकच्या वणी गडावर जाणाऱ्या या चालत्या बसने अचानक पेट घेतला. प्रवाशी वाहतूक करणाऱ्या बसला अचानक आग लागल्याने खळबळ माजली. प्रसंगावधान राखत प्रवाशी खाली उतरले. त्यामुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही. नांदुरीहून वनी गडावर ही बस जात होती. बसला आग लागल्याचं कळताच स्थानिक तरुणांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
वणी गडावर जाणाऱ्या बसने घेतला पेट, एसटी महामंडळाची बस #Nashikpic.twitter.com/3ymuqtYGJf
— Lokmat (@lokmat) October 8, 2022
दुपारी बारा वाजेच्या दरम्यान श्री सप्तशृंग गड येथे ग्रामपंचायतच्या टोलनाक्याच्या जवळ महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या एसटी बसला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. एसटी बस पिंपळगाव बसवंत डेपोची होती. (बस क्रमांक एम एच 14 बीटी 3752) प्रसंगावधान राखून चालक आणि वाहक यांनी सर्व प्रवाशांना खाली उतरवले. यात्रा नियंत्रण समितीने तातडीने तेथे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक स्वयंसेवक, विश्वस्त संस्थेचे सुरक्षा कर्मचारी, स्थानिक ग्रामस्थ, रोप वे कर्मचारी आदी यांना तातडीने घटनास्थळी पाचारण करून फायर एक्स्टिंविशर द्वारे तातडीने आग विझविली.
सर्वांनी प्रसंगावधान राखून वेळीच उपाययोजना योग्य प्रकारे राबविल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेमध्ये कुठल्याही भाविकाला अथवा कर्मचाऱ्याला कोणत्याही प्रकारे इजा झालेली नसून सर्व सुरक्षित आहेत. भाविकांनी कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये. असे आवाहन जिल्हा महसूल, पोलीस व ट्रस्ट प्रशासन तसेच स्थानिक ग्रामपालिका तसेच महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
नाशिकमध्ये खासगी बस आणि ट्रकची धडक
औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरची चौकात असलेल्या चौफुलीवर लक्झरी बस व टँकर यांच्यात शनिवारी (दि.8) पहाटे सव्वा पाच वाजता भीषण अपघात झाला. अपघातात चिंतामणी ट्रॅव्हलच्या बसने पेट घेतल्याने जवळपास १२ प्रवासी होरपळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. नाशिक महापालिका आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांनी यासंदर्भातील प्राथमिक माहिती दिली आहे. यवतमाळ येथून बस मुंबईकडे जात असताना सदर अपघात घडल्याचे प्रत्यक्ष दर्शनी सांगितले.
पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
नाशिक बस दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हळहळ व्यक्त केली. या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या जवळच्या गमावले त्यांच्यासोबत माझ्या सहवेदना आहेत. या अपघातातील जखमी लवकरात लवकर बरे होवोत. स्थानिक प्रशासन बाधितांना शक्य ती सर्व मदत करत आहे असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला. त्याचसोबत पंतप्रधान निधीतून या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी २ लाख रुपये तर जखमींना ५० हजार जाहीर करण्यात आले आहेत.
तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अपघाताबाबत तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मृत आणि त्यांच्या कुटुंबियांप्रति सहवेदना प्रकट करून या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. अपघातातील जखमींवर शासकीय खर्चाने वैद्यकीय उपचार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. अपघाताच्या कारणांचा सर्वंकष चौकशीतून शोध घेतला जाईल. त्याबाबत सर्व यंत्रणांना निर्देश देण्यात आले आहेत. घटनास्थळावरील मदतीसाठी तसेच रूग्णालयातील उपचारासाठी सर्व यंत्रणा तातडीने कार्यान्वित व्हाव्यात यासाठी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या आहेत अशी माहिती त्यांनी दिली.