'ऑपरेशन विजय'चा थरार; युद्धभूमीवर भारतीय सैनिकांकडून शत्रुची छावणी उद्ध्वस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 11:17 AM2022-05-25T11:17:55+5:302022-05-25T11:18:39+5:30
नाशिक येथील गांधीनगर लष्करी तळावर युद्धभूमीचा थरार अनुभवायला मिळाला.
नाशिक : येथील गांधीनगर लष्करी तळावर युद्धभूमीचा थरार अनुभवायला मिळाला. निमित्त होते, कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलच्या (कॅट्स) लढाऊ वैमानिकांच्या ३७व्या तुकडीच्या दीक्षांत सोहळ्याचे. यावेळी सैनिकांनी ऑपरेशन 'विजय'ची झलक प्रात्यक्षिकांद्वारे दाखविली.
गांधीनगर येथे स्थित कॅट्सच्या हवाई तळावर लष्करी थाटात बुधवारी सकाळी ९ वाजता दीक्षांत सोहळ्याला लष्करी बॅन्ड पथकाच्या धूनने सुरुवात झाली. ३७ प्रशिक्षणार्थी वैमानिकाच्या या तुकडीने अत्यंत शिस्तबद्ध असे परेड सादर करत वरीष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना 'सॅल्यूट' केला. यावेळी सर्व प्रशिक्षणार्थींना 'एव्हीएशन विंग' व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून लेफ्टनंट जनरल तथा आर्मी एव्हीएशनचे डायरेक्टर जनरल कर्नल कमांडन्ट अजयकुमार सुरी हे उपस्थित होते.
या तुकडीचे मुख्य आकर्षण ठरल्या त्या कॅप्टन अभिलाषा बराक. आर्मी एव्हीएशनमधून भारतीय सैन्यात अभिलाषा यांच्या रूपाने पहिली महिला लढाऊ हेलिकॉप्टर वैमानिक दाखल झाली. त्यांनाही एव्हीएशन विंग प्रदान करण्यात आली. प्रशिक्षणादरम्यान त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे अभिलाषा या 'फ्लेजलिंग' ट्रॉफीच्या मानकरी ठरल्या.
त्या २०१८ साली त्या चेन्नई येथून भारतीय सैन्य दलात भरती झाल्या. दरम्यान त्यांची राष्ट्पती रामनाथ कोविंद यांच्यासमोर होणाऱ्या हवाई प्रत्यक्षिकासाठी कमांडर म्हणून निवड झाली. या बहुमानानंतर २०१८ साली त्यांनी चेन्नईच्या अकादमीतील प्रशिक्षण पूर्ण करत आर्मी एव्हीएशन कॉर्प्सची निवड केली. त्यानंतर त्या नाशिकच्या 'कॅट्स'मध्ये दाखल झाल्या. पुरुष वैमानिकांच्या खांद्याला खांदा लावून अभिलाषा यांनी १८ आठवड्यांचे लढाई हेलिकॉप्टर उड्डाणाचे खडतर व आव्हानात्मक प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले. मूळच्या हरियाणा राज्यातील रोहतक जिल्ह्याच्या रहिवासी आहेत,त्यांचे वडील आणि भावाने ही सैन्यदलात सेवा बजवली आहे..
दीक्षांत संचलनानंतर चित्ता, चेतक, ध्रुव या हेलिकॉप्टरची थरारक प्रात्यक्षिक सादर करण्यात आली, हेलिकॉप्टरमधून युद्धभूमीवर दाखल होत शत्रूच्या छावण्यांवर हल्ला चढविणे, जखमी सैनिकांना एअर लिफ्ट करणे, शत्रूच्या तळावर मोर्टर तोफेतून बॉम्बगोळा डागणे अशी हृदयाचा ठोका चुकविणारी प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी भारत मातेचा जयघोष करत टाळ्यांचा कडकडाट केला.