तोंडावर तेजाब फेकून तलाक देण्याचा दम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 01:38 AM2019-04-09T01:38:17+5:302019-04-09T01:38:35+5:30
रंगीत साडीचा कारखाना वाढविण्यासाठी माहेरून १ लाख रुपये आणावेत म्हणून विवाहितेचा छळ करून तिला मारहाण करीत पैसे आणले नाही तर तुझ्या तोंडावर तेजाब फेकून तुला तलाक देईन अशी धमकी देणाऱ्या पती व सासरच्या चौघांविरुद्ध रमजानपुरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मालेगाव : रंगीत साडीचा कारखाना वाढविण्यासाठी माहेरून १ लाख रुपये आणावेत म्हणून विवाहितेचा छळ करून तिला मारहाण करीत पैसे आणले नाही तर तुझ्या तोंडावर तेजाब फेकून तुला तलाक देईन अशी धमकी देणाऱ्या पती व सासरच्या चौघांविरुद्ध रमजानपुरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समा आफरीन सोहेल (२०), हल्ली रा. सनाउल्लानगर या विवाहितेने फिर्याद दिली. तिचा पती मोमेन सोहेल शकील अहमद, रा. अन्सारगंज आझादनगर याने पत्नी सना आफरीन हिने माहेरून १ लाख रुपये आणावेत म्हणून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. तिला घराबाहेर हाकलून दिले. सासरच्या लोकांनी शिवीगाळ करुन तिचे आईवडील पैसे देत नसतील तर तिला तलाक देऊन टाक अशी कानभरणी केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास हवालदार शेवाळे करीत आहेत.
उभ्या ट्रेलरला धडक मारुन पीकअपमधील तरुण ठार
मालेगाव : मुंबई- आग्रा महामार्गावर सायने शिवारात हॉटेल सिमला इन समोर कच्च्या रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रेलरला पाठीमागुन धडक मारुन पीकअप वाहनात बसलेल्या तरुणाच्या मृत्युस कारणीभूत ठरलेल्या पीकअप चालकाविरुद्ध तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. रविवारी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. इरफान मुस्तफा खाटीक (२४) रा. पारोळा, जि. जळगाव यांनी फिर्याद दिली. पीकअप (क्र. एम.एच. १९ बी.११२४) वरील चालक जयंत मगन चौधरी रा. धरणगाव याने मालेगावकडून धुळ्याकडे भरधाव वेगात वाहन चालवून रस्स्त्याच्याकडेला उभ्या असलेल्या (क्र. एम.एच.०४. एच. वाय. ७२६१) ला पाठीमागुन धडक दिली. अपघात करुन पीकअपमध्ये बसलेला साक्षीदार रमेश सूर्यवंशी (३६) रा. धरणगाव, जि. जळगाव याच्या डोक्यास गंभीर दुखापतीस व त्याच्या मरणास व स्वत: व साक्षीदाराच्या नुकसानीस कारणीभूत ठरला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास हवालदार राजपूत करीत आहे.
एरंडगावी महिलेस मारहाण
ंमालेगाव : तालुक्यातील एरंडगाव येथील महिलेच्या घरासमोरील बांधाच्या रस्त्यावर लघुशंका करीत असलेल्या जितेंद्र रामदास देवरे व त्याच्या तीन साथीदारांवर तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. मथुराबाई विठ्ठल देवरे (५०) रा. एरंडगाव शिवार शिंदे वस्ती यांनी फिर्याद दिली. फिर्यादीने जितेंद्र देवरे याला घरासमोर लघवी का करतो असे म्हटल्याचा राग येऊन त्याने अश्लील शिवीगाळ केला व फिर्यादीस काठीने मारहाण केली. अन्य तिघांनीही शिवीगाळ व मारहाण केली. झालेल्या झटापटीत सोन्याचे डोरले गहाळ झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.