धाड टाकून भोंदू तांत्रिकाकडून ३४ तोळे सोने जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 12:48 AM2017-11-28T00:48:15+5:302017-11-28T00:48:48+5:30
ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथचा रहिवासी उदयराज रामआश्रम पांडे या भोंदू तांत्रिकाच्या पोलिसांनी काही दिवसांपूर्वी मुसक्या आवळल्या असून, त्याने जमविलेली ‘माया’ बघून पोलीस अवाक् झाले आहेत. उत्तर प्रदेशमधील जौनपूर येथे त्याच्या सुनेच्या घरी व दोन सराफांच्या दुकानांमध्ये पुन्हा धाड टाकून सरकारवाडा पोलिसांनी ३४ तोळे सोन्याचे व एक किलो चांदीचे दागिने जप्त केले आहेत.
नाशिक : ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथचा रहिवासी उदयराज रामआश्रम पांडे या भोंदू तांत्रिकाच्या पोलिसांनी काही दिवसांपूर्वी मुसक्या आवळल्या असून, त्याने जमविलेली ‘माया’ बघून पोलीस अवाक् झाले आहेत. उत्तर प्रदेशमधील जौनपूर येथे त्याच्या सुनेच्या घरी व दोन सराफांच्या दुकानांमध्ये पुन्हा धाड टाकून सरकारवाडा पोलिसांनी ३४ तोळे सोन्याचे व एक किलो चांदीचे दागिने जप्त केले आहेत. नितीन फिरोदिया यांच्या घरात त्यांच्या मैत्रिणीच्या मुलीला जबरी चोरी करण्यास भाग पाडणाºया भोंदू तांत्रिकाला सरकारवाडा पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अटक केली आहे. सुरुवातीला आठ दिवसांच्या पोलीस कोठडीत तपास पथकाने त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरून मूळ गावी जौनपूरला जाऊन वेगवेगळ्या लोकांची फसवणूक करून हडपलेले ३९० ग्रॅम सोन्यासह गुन्ह्यात वापरलेली स्कॉर्पिओ, बुलेट हस्तगत केली होती. त्याने विविध पूजापाठाचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक करून गडगंज संपत्ती जमविली असल्याचे तपासात उघड झाले आहे. जौनपूर येथील त्याचा सुमारे ५० लाखांचा आलिशान बंगला बघून तपास पथकालाही आश्चर्याचा धक्का बसला होता. यानंतर संशयित आरोपी भोंदूबाबाची पुन्हा सात दिवस पोलीस कोठडी न्यायालयाकडून मिळविली. सरकारवाडा पोलिसांनी जौनपूरला जाऊन सुनेकडे दिलेले सहा तोळे सोन्याच्या दागिन्यांसह येथील दोन सराफांना विकलेले सोने-चांदीचे दागिने असे एकूण ३४ तोळे सोने
व एक किलो चांदी दागिन्यांच्या स्वरूपात हस्तगत करण्यात यश आले आहे. सदर गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सारिका आहिरराव यांच्याकडे आहे. त्यांच्या पथकाने सदर कामगिरी पार पाडली. एकूणच या गुन्ह्यात संशयित आरोपीची संपूर्ण पंधरा दिवसांची पोलीस कोठडी पोलिसांनी मिळवून कारवाई पूर्ण केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांनी दिली. भोंदूबाबाकडून आतापर्यंत एकूण ८०० ग्रॅम सोने, एक किलो चांदी, एक मोटार व दुचाकी मिळून एकूण २९ लाखांचा मुद्देमाल सरकारवाडा पोलिसांनी हस्तगत केला आहे.