गुरुवार पासून लासलगावहून रेल्वेने भाजीपाला जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 08:10 PM2019-12-18T20:10:01+5:302019-12-18T20:14:52+5:30
लासलगाव रेल्वेस्थानकावरून मुंबईकडे गेल्या अनेक वर्षांपासून भाजीपाला रेल्वेने पाठविला जात असताना दोन वर्षांपासून कोणतेही कारण न देता लासलगाव रेल्वेस्थानकावरून मुंबईकडे जाणाºया रेल्वेने भाजीपाला पाठविण्याची सुविधा काही कारणास्तव बंद करण्यात आली होती.
लोकमत न्युज नेटवर्क
नाशिक : गेल्या दोन वर्षांपासून रेल्वेने बंद केलेली भाजीपाला वाहतूक सेवा आता पुन्हा पूर्ववत सुरू होणार असून, गुरुवार (दि. १९) पासून लासलगाव रेल्वेस्थानकावरून गोदावरी एक्स्प्रेसने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा भाजीपाला मुंबईला पाठविण्यास सुरुवात करण्यात येणार आहे.
लासलगाव रेल्वेस्थानकावरून मुंबईकडे गेल्या अनेक वर्षांपासून भाजीपाला रेल्वेने पाठविला जात असताना दोन वर्षांपासून कोणतेही कारण न देता लासलगाव रेल्वेस्थानकावरून मुंबईकडे जाणा-या रेल्वेने भाजीपाला पाठविण्याची सुविधा काही कारणास्तव बंद करण्यात आली होती. त्या अनुषंगाने स्थानिक शेतकरी, व्यापाऱ्यांनी खासदार डॉ. भारती पवार यांची भेट घेऊन भाजीपाला पाठविण्याची सुविधा पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली होती. त्यावरून डॉ. पवार यांनी, भुसावळ येथे रेल्वेच्या महाप्रबंधक एम. के. गुप्ता आणि वाणिज्य विभागाचे प्रमुख विनोद कुमार यांच्याशी चर्चा करून लासलगाव येथील शेतक-यांचे शिष्टमंडळ चर्चेकरिता भुसावळ येथे पाठवले होते. या शिष्टमंडळात पंचायत समिती सदस्य शिवा पाटील सुराशे, बाळासाहेब सोनवणे, सनी पाठक, दत्तू सुराशे आदींचा समावेश होता. रेल्वेच्या अधिकाºयांनी शेतक-यांची विनंती व त्यातील व्यवहार्यता तपासून गुरुवार, १९ डिसेंबरपासून भाजीपाला मुंबईकडे लासलगाव रेल्वेस्थानकावरून विविध रेल्वेगाड्यांनी रवाना करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे सकाळच्या सत्रात असलेल्या रेल्वे गाड्यांनी भाजीपाला मोठ्या प्रमाणात व सायंकाळच्या वेळी खवादेखील मुंबईकडे रवाना होण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती खासदार डॉ. भारती पवार यांनी दिली.