तिबेटियन मार्केट स्फोट; चौकशी समिती नियुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 04:50 PM2017-10-09T16:50:04+5:302017-10-09T16:52:29+5:30
नाशिक : गेल्या शनिवारी (दि.७) कॅनडा कॉर्नरवरील महापालिकेच्या तिबेटियन मार्केटमध्ये असलेल्या गाळ्यात गॅसगळतीमुळे झालेल्या स्फोटानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी समिती नियुक्त केली आहे. याशिवाय, सदर समितीमार्फत शहरातील महापालिकेच्या अन्य व्यापारी गाळ्यांचीही तपासणी केली जाणार असल्याची माहिती आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
तिबेटियन मार्केटमधील एका गाळ्यात शनिवारी (दि.७) स्फोट होऊन लगतच्या अन्य गाळ्यांचेही मोठे नुकसान झाले होते. सदर स्फोटाच्या तपासणीसाठी पुण्याहून केंद्रीय राखीव सुरक्षा बलाचे पथकही दाखल झाले होते. गॅसगळतीमुळे सदर स्फोट झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. दरम्यान, महापालिकेच्या गाळ्यामध्ये स्फोट झाल्याने आयुक्तांनी या साºया प्रकाराची चौकशी करण्यासाठी समिती नियुक्त केली आहे. अतिरिक्त आयुक्त रमेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली विविध कर विभागाचे उपआयुक्त रोहिदास दोरकूळकर, अग्निशमन दलाचे प्रमुख अनिल महाजन व आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाणे यांची समिती गठित करण्यात आली आहे. सदर समिती गाळ्यांची तपासणी करून नियमांचे काही उल्लंघन झाले आहे काय, याची पडताळणी करणार आहे. चौकशीत नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्यास संबंधित गाळेधारकावर कारवाई करण्यात येणार असून, त्याच्याकडून गाळा काढून घेण्याचीही कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली आहे.