बससेवेच्या नावासह तिकीटदरांवर आज शिक्कामोर्तब होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:18 AM2020-12-30T04:18:59+5:302020-12-30T04:18:59+5:30
महापालिकेची बससेवा येत्या २६ जानेवारीपासून सुरू होणार असून त्यासाठी येत्या १ जानेवारीपासून प्रत्यक्ष बस रस्त्यावर आणून साॅफ्टवेअरची चाचणी केली ...
महापालिकेची बससेवा येत्या २६ जानेवारीपासून सुरू होणार असून त्यासाठी येत्या १ जानेवारीपासून प्रत्यक्ष बस रस्त्यावर आणून साॅफ्टवेअरची चाचणी केली जाणार आहे. कंपनीची डिसेंबर महिन्याच्या आत वार्षिक सर्वसाधारण सभा होणे आवश्यक असल्याने त्या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. यात कंपनीचा आर्थिक हिशेब, बदललेल्या संचालकांची नोंद घेणे यासह अन्य अनेक विषय मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहेत. याच संचालक मंडळाच्या बैठकीत याआधी घेण्यात आलेल्या काही निर्णयांवर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे. यात महामंडळाच्या तुलनेत नाशिक महापालिकेने कमी भाडे ठेवले असून दोन किलोमीटरला पाच रुपये इतके किमान भाडे ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर नाशिक मनपाच्या बससेवेचे सीटी कनेक्ट - कनेक्टिंग नाशिक असे सोपे नाव ठेवण्यात आले असून त्यावरही मंगळवारी शिक्कामोर्तब होणार आहे.
महापालिकेच्या सेवेसाठी काही पदे निर्मिती करण्यावर चर्चा हेाणार आहे. वार्षिक सभेच्या निमित्ताने एकंदर तयारीचा आढावा घेण्यात येईल, अशी माहिती आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.
कोट...
सीटी कनेक्ट हे ब्रीद विचारपूर्वक ठेवण्यात आले असून हा कनेक्ट केवळ बससेवेशी संबंधित नाही तर मनपाच्या नियोजित मेट्रोपासून अगदी रोप वे सुरू झाला तर त्यासाठीदेखील हे कनेक्ट कामास येईल.
- कैलास जाधव, आयुक्त मनपा