तिकीट रेल्वेचे; प्रवास एसटीचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 12:44 AM2017-08-31T00:44:39+5:302017-08-31T00:44:46+5:30
आसनगावजवळ दुरांतो एक्स्प्रेसला मंगळवारी झालेल्या अपघातानंतर इगतपुरी येथे थांबविण्यात आलेल्या तीनही एक्स्प्रेसमधील प्रवाशांना एस.टी. महामंडळाच्या बसेसच्या माध्यमातून कल्याणपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात आली होती. रेल्वेचे तिकीट दाखवून कल्याणपर्यंतचा प्रवास करण्याची मुभा देण्यात आली होती, यामुळे सुमारे सातशेपेक्षा अधिक प्रवाशांना कल्याणपर्यंत पोहचणे शक्य झाले.
नाशिक : आसनगावजवळ दुरांतो एक्स्प्रेसला मंगळवारी झालेल्या अपघातानंतर इगतपुरी येथे थांबविण्यात आलेल्या तीनही एक्स्प्रेसमधील प्रवाशांना एस.टी. महामंडळाच्या बसेसच्या माध्यमातून कल्याणपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात आली होती. रेल्वेचे तिकीट दाखवून कल्याणपर्यंतचा प्रवास करण्याची मुभा देण्यात आली होती, यामुळे सुमारे सातशेपेक्षा अधिक प्रवाशांना कल्याणपर्यंत पोहचणे शक्य झाले. आसनगावनजीक दुरांतो एक्स्प्रेसला झालेला अपघात आणि त्यानंतर मुंबईत सुरू असलेला मुसळधार पाऊस यामुळे मनमाड, नाशिक येथून मुंबईला जाणाºया प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. नाशिकरोडला अडकलेल्या प्रवाशांना स्वखर्चाने महामंडळाच्या बसेसमधून तिकीट काढून महामार्ग बसस्थानक गाठावे लागले असले तरी इगतपुरीत अडकलेल्या प्रवाशांना कल्याणपर्यंत रेल्वेच्याच तिकिटावर बसद्वारे नेण्यात आले. रेल्वे प्रशासनाने तातडीची उपाययोजना म्हणून महामंडळाला प्रवासी भाडे देण्याची तयारी दर्शविल्यानंतर ज्या प्रवाशांकडे रेल्वेचे तिकीट होते त्यांना प्राधान्याने कल्याणपर्यंत बसने पोहोचविण्यात आले. या प्रवाशांचे भाडे आता रेल्वे प्रशासन देणार असल्याची माहिती महामंडळाचे अधिकारी पाटील यांनी दिली. रेल्वे प्रवाशांचे हाल पाहून रेल्वे प्रशासनाने तातडीने इगतपुरी बसस्थानक प्रमुखांशी संपर्क साधून रेल्वेच्या प्रवाशांसाठी बसेस देण्याची विनंती केली असता सुमारे १५ बसेसच्या माध्यमातून प्रवाशांना कल्याणपर्यंत सोडण्यात आले. रेल्वेचे तिकीट दाखवून प्रवाशांना एस.टी. बसमध्ये बसविले जात होते. यासाठी रेल्वे प्रशासनाचे दोन तिकीट निरीक्षक, एस.टी. महामंडळाचे दोन अधिकारी आणि रेल परिषदेचे सचिव देवीदास पंडित आणि त्यांच्या साथीदारांनी प्रवाशांना मदत करीत कल्याणपर्यंतच्या बसेस उपलब्ध करून दिल्या. बसेसमध्ये बसण्यासाठी इगतपुरी रेल्वेस्थानकाबाहेर रांगा लावण्यात आल्या होत्या. यासाठी स्थानिक नागरिक आणि रेल परिषदेच्या सदस्यांनी प्रवाशांना मदत केली. त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्थादेखील स्थानिक नागरिकांनी केली होती.