नाशिकमधील बाजारपेठांमधील ‘तिकीट’ तात्पुरते स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:15 AM2021-04-01T04:15:58+5:302021-04-01T04:15:58+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनावश्यक गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी बाजारपेठांमध्ये नागरिकांना पाच रुपये प्रतिव्यक्तीप्रमाणे प्रवेश शुल्क आकारून प्रवेश देण्याचा प्रयोग मनपा व ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनावश्यक गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी बाजारपेठांमध्ये नागरिकांना पाच रुपये प्रतिव्यक्तीप्रमाणे प्रवेश शुल्क आकारून प्रवेश देण्याचा प्रयोग मनपा व पोलीस प्रशासनाकडून सोमवारपासून अंमलात आणला जात होता. या प्रयोगाला ग्राहकांसह विक्रेत्यांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत होता; मात्र मनपाकडे असलेले कमी मनुष्यबळ आणि पावतीवर नाव, मोबाईल क्रमांक आणि पाच रुपये आदी माहिती लिहिण्यास जाणारा वेळ यामुळे मेन रोडसह अन्य सातपुर, पंचवटी, इंदिरानगर, पवननगर आदी भागांतील निश्चित केलेल्या बाजारांत तिकीट काैंटरपुढे नागरिकांची गर्दी होत होती. यामुळे ‘सोशल डिस्टन्स’ला तडा जाणार असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या होत्या. परिणामी बुधवारी (दि.३१) पाण्डेय यांनी पवननगर, मेन रोड बाजारपेठांना संध्याकाळी भेट देत पाहणी केली तसेच येथील विक्रेत्यांसोबतही त्यांनी संवाद साधला. यानंतर पाण्डेय यांनी पाच रुपये आकारणीला तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती देण्याचा निर्णय जाहीर केला.
--इन्फो--
...लवकरच पुन्हा ‘तिकीट’
पुरेशे मनुष्यबळ अन् इलेक्ट्रॉनिक पावती यंत्रे उपलब्ध होताच शहरातील बाजारपेठांमध्ये परिपूर्ण तयारीने पाच रुपये तिकीट आकारणीचा प्रयोग पूर्ण क्षमतेने राबविला जाणार असल्याचेही पाण्डेय यांनी सांगितले. यासाठी मनपा आयुक्त कैलास जाधव यांच्याशीही चर्चा सुरू असून लवकरत मनपा प्रशासन ऑनलाईन तिकीट बुकिंग व्यवस्था तसेच इलेक्ट्रॉनिक पावती यंत्रे उपलब्ध करणार आहे.
--इन्फो---
...आता पोलीस देणार मोफत ‘टोकन’
मनपाऐवजी पोलीस प्रशासनाकडून शहरातील मेन रोड बाजारपेठ, पवननगर, इंदिरानगर, नाशिक रोड भाजी बाजार तसेच एम.जी.रोड मोबाईल मार्केटमध्ये येणाऱ्या ग्राहकांना प्रवेश करताना वेळेची नोंद असलेले टोकन मोफत दिले जाईल. जेव्हा ग्राहक बाजारातून बाहेर पडेल तेव्हा ते टोकन त्याला पुन्हा प्रवेशद्वारावर पोलिसांकडे जमा करावे लागणार आहे. यावेळी एक तासापेक्षा अधिक वेळ जर ग्राहक बाजारात रेंगाळत राहिल्याचे लक्षात आले तर टोकनवरून पडताळणी करून संबंधितावर दंडात्मक कारवाईदेखील केली जाणार असल्याचे पाण्डेय म्हणाले.
---इन्फो---
पायी गस्त कायम
बाजारात पोलिसांची पायी गस्त कायम राहणार असून, अनावश्यकरित्या तासाभरापेक्षा जास्त वेळ कोणी रेंगाळत असल्याचे दिसून आल्यास त्यांच्याकडील ‘पोलीस टोकन’ तपासून वेळेची पडताळणी करत दंडात्मक कारवाईदेखील केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना बाजारात एक तासापेक्षा अधिक वेळ थांबणे ‘महाग’ पडणार आहे.