वाघ खून प्रकरणातील फरार संशयित जाळ्यात
By admin | Published: January 25, 2017 12:37 AM2017-01-25T00:37:05+5:302017-01-25T00:38:04+5:30
कारवाई : सिडकोतून केली अटक
पंचवटी : हनुमानवाडी येथील भेळविक्री करणाऱ्या सुनील वाघ व हेमंत वाघ या दोघांवर सख्ख्या भावंडांवर प्राणघातक हल्ला करून सुनील वाघ याची हत्त्या केल्या प्रकरणात फरार असलेला संशयित अर्जुन रवींद्र परदेशी (२२) याच्या पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हा शोध पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. मंगळवारी पहाटेच्या सुमाराला परदेशी हा सिडकोतील हेडगेवार चौकात असल्याची माहिती पोलिसांना मिळताच सापळा रचून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. आठ महिन्यांपूर्वी हनुमानवाडीतील भरचौकात दहा ते बारा संशयितांनी जुन्या भांडणाची कुरापत काढून भेळविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या सुनील व हेमंत वाघ या दोघा भावंडांवर प्राणघातक हल्ला चढविला होता या हल्ल्यात सुनीलचा मृत्यू झाला होता याप्रकरणी पंचवटी पोलिसांत परदेशी टोळीतील संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या टोळीतील कुंदन परदेशी, राकेश कोष्टी व त्यांच्या अन्य साथीदारांना अटक केली आहे. काल संशयित परदेशी हा सिडकोत असल्याबाबत माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक महेश इंगोले, हवालदार प्रवीण कोकाटे, सुरेश नरवडे, प्रभाकर पवार, महेश साळुंखे, संदीप शेळके, संतोष काकड आदिंनी परिसरात सापळा रचून परदेशी याला ताब्यात घेतले आहे. आतार्पंत पोलिसांनी या गुन्ह्यात आठ ते नऊ संशयितांना अटक केली आहे. काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी कोष्टी याला सिडकोतून ताब्यात घेतले होते. (वार्ताहर)