लादलेल्या उमेदवारांच्या पालख्या वाहण्याची वेळ !

By admin | Published: June 18, 2014 01:07 AM2014-06-18T01:07:02+5:302014-06-18T13:50:49+5:30

इगतपुरी विधानसभा मतदारसंघातील राजकारणातील हारजितसाठी निर्णायक ठरणाऱ्या त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या स्थानिक नेतृत्त्वाची स्थिती मात्र काहीशी दुर्लक्षितच आहे.

Time to blow a ladder of candidates! | लादलेल्या उमेदवारांच्या पालख्या वाहण्याची वेळ !

लादलेल्या उमेदवारांच्या पालख्या वाहण्याची वेळ !

Next

त्र्यंबकेश्वर : इगतपुरी विधानसभा मतदारसंघातील राजकारणातील हारजितसाठी निर्णायक ठरणाऱ्या त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या स्थानिक नेतृत्त्वाची स्थिती मात्र काहीशी दुर्लक्षितच आहे. त्यामुळेच लादलेल्या उमेदवारांची पाठराखण करण्याची वेळ येथील मतदारांवर आली असून, याहीवेळेस येरे माझ्या मागल्या होते की काय, स्थानिक नेतृत्त्वाला नशीब अजमाविण्याची संधी मिळेल याकडे लक्ष वेधले गेले आहे.
विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागल्यापासून दोन्ही तालुक्यांमध्ये इच्छुकांची मोर्चे बांधणी सुरू आहे. मतदारसंघातील काही इच्छुकांनी अनेक पक्ष बदलले आहेत. त्र्यंबक तालुका काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. १९५२ पासूनच्या १४ वेळा झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला नऊ वेळा, कम्युनिस्ट दोन वेळा, शिवसेना दोन वेळातर भाजपा एक वेळा याप्रमाणे पक्षांचे आमदार निवडले गेले आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी आहे. यावेळेस राष्ट्रवादीने जास्त जागांची मागणी केली आहे. या मुद्द्यावर आघाडी, सफल झाल्यास इगतपुरीची जागा कोणाला मिळेल ते आज सांगता येणार नाही. राष्ट्रवादी आघाडी पैकी जागा काँग्रेसला सुटत असल्याने आज तालुक्यावर काँग्रेसचा प्रभाव आहे. गत विधानसभा निवडणुकीत काँगे्रसच्या निर्मला गावित विजयी झाल्या होत्या. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भुजबळांना आघाडी मिळाली होती. तालुक्यात भुजबळांना ३३९१४, तर गोडसे यांना १८५९४ मते मिळाली. यावरून त्र्यंबक तालुक्यात आजही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव आहे. जवळपास साडेपंधरा हजाराची (१५३२0) आघाडी भुजबळांना मिळाली आहे, तर शहरातही ३९0 मतांची आघाडी घेतली आहे. मोदी लाट अन्यत्र असली तरी त्र्यंबक तालुक्यावर फारसा, फरक झाला नाही. जिल्ह्यात इगतपुरी मतदारसंघातच भुजबळांना आघाडी मिळाली असली तरी त्याचे श्रेय त्र्यंबक तालुक्याला आहे. हे कोणीही नाकारणार नाही. मतदारसंघात कोणकोणाला रिंगणात कोणत्या पक्षाकडून कोण उमेदवार उतरविला जाईल याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Web Title: Time to blow a ladder of candidates!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.