प्रचाराला निघताना घरातूनच डबा असायचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 01:00 AM2019-10-05T01:00:53+5:302019-10-05T01:01:28+5:30
सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. परंतु ह्या निवडणुकीपेक्षा १९६७ सालापासूनच्या निवडणुकांचा अनुभव घेतला आहे. मग त्या वॉर्डाच्या असोत, महानगरपालिकेच्या असोत. आत्ताच्या आणि पूर्वीच्या निवडणुकीत केवढा फरक आहे. मग तो कार्यकर्त्यांचा असो, पैशाचा असो, वातावरणाचाही फरक आहेच.
सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. परंतु ह्या निवडणुकीपेक्षा १९६७ सालापासूनच्या निवडणुकांचा अनुभव घेतला आहे. मग त्या वॉर्डाच्या असोत, महानगरपालिकेच्या असोत. आत्ताच्या आणि पूर्वीच्या निवडणुकीत केवढा फरक आहे. मग तो कार्यकर्त्यांचा असो, पैशाचा असो, वातावरणाचाही फरक आहेच. मला कै . दादासाहेब वडनगरे विरुद्ध कै. गणपत काठे यांची विधानसभेची निवडणूक आठवते. घरून जेवणाचे डबे घ्यायचे, ज्या भागात आमचा प्रचार सुरू असे त्या भागातील कार्यकर्त्यांच्या घरी थांबून सर्वजण एकत्र जेवत असू आणि जेवण म्हणजे अवघे ३० मिनिटात होत असे. कारण सर्व लक्ष प्रचार करून जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी मतदारांपर्यंत कसे पोहोचता येईल याकडे असायचे. शिवाय आम्हा महिलांना घरची जबाबदारी होतीच. मुले लहान होती. ते सर्व सांभाळून प्रचार करणे यातही आनंद होता. मला आठवते डॉ. दौलतराव आहेरांची आमदारकीची निवडणूक झाली व ते प्रथमच निवडणुकीला उभे राहून चांगल्या फरकाने निवडूनही आले. त्यानंतर मंत्रिमंडळ, खातेवाटप याविषयी आमच्या कुटुंबात चर्चा चालू होती. आरोग्यमंत्री डॉ. आहेरांनाच करावे, कारण त्यांचे शिक्षण, कामाचा आवाका आणि इतर अनेक कारणे होती. आमचे घर म्हणजे ‘पक्ष कार्यालयच’ असायचे. कै . बंडोपंत जोशी यांनी स्व. प्रमोद महाजनांना फोन केला की डॉ. आहेरांनाच आरोग्यमंत्री करावे. त्यावेळेस ही नेतेमंडळी सहज फोनवर उपलब्ध असत. स्व. प्रमोदजी, स्व. गोपीनाथजी मुंडे यांच्याशी आमचे घरगुती संबंध होते. ही सर्व ज्येष्ठ मंडळी आपल्याकडेच मुक्कामाला असत. स्व. गणपतराव काठे यांची आमदारकीची निवडणूक आठवते. गणपतरावांनाच तिकीट मिळावे म्हणून त्यांची प्रांतातील ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा सुरू होती, तळ्यात-मळ्यात सुरू होते. आम्हाला पुण्याला निघायचे होते, कारण दोन दिवसांनी पुण्यात आमच्या मुलीचे लग्न होते. कै . गणपतराव काठेंना विधानसभेचे तिकीट मिळाले व ते निवडूनही आले. मुलीच्या लग्नकार्यापेक्षा बंडोपंतांचे लक्ष निवडणुकीकडे अधिक होते. निशिगंधा मोगल, प्रा. मंगला सवदीकर, प्रा. विद्युलता गद्रे, शोभाताई आहेर, अलकाताई आहेर, चंद्रकला जोशी, तिवारीभाभी अशा अनेक नव्या-जुन्या मैत्रिणी होत्या. पण आम्हा महिलांची काळजी घेणारेही तेवढेच समर्थ कार्यकर्ते होते. त्यामुळे आम्हाला घरी येण्यास उशीर झाला तरी घरची मंडळी निर्धास्त असायाची.
मंगला प्रभाकर जोशी