यंदाही इदगाह मैदानावरच गणेशमूर्ती विक्रीचे गाळे
By Admin | Published: July 9, 2017 12:29 AM2017-07-09T00:29:32+5:302017-07-09T00:29:46+5:30
नाशिक : गणेशमूर्ती विक्रीच्या गाळ्यांच्या लिलावाची प्रक्रिया महापालिकेमार्फत राबविली जाण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : दि. २५ आॅगस्टपासून गणेशोत्सव साजरा होणार असल्याने गणेशमूर्ती विक्रीच्या गाळ्यांच्या लिलावाची प्रक्रिया महापालिकेमार्फत पुढील आठवड्यापासून राबविली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, मागील वर्षाप्रमाणे यंदाही इदगाह मैदानावरच गणेशमूर्ती विक्रीचे गाळे उभारण्यास परवानगी दिली जाणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.
गणेशोत्सव दीड महिन्यावर येऊन ठेपला आहे. गणेशोत्सवाच्या ऐन तोंडावर गणेशमूर्ती विक्री गाळ्यांच्या लिलावाची प्रक्रिया महापालिकेमार्फत राबविली जात असते. त्यामुळे बरेच वादही उद्भवत असतात. यंदा महापालिकेने महिनाभर अगोदरच गाळे विक्रीची प्रक्रिया राबविण्याचे ठरविले आहे. मागील वर्षाप्रमाणेच यंदाही इदगाह मैदानावर गाळे उभारणीसाठी परवानगी दिली जाणार आहे. गेल्या काही वर्षांपासून गणेशमूर्तीच्या गाळ्यांबाबत विक्रेत्यांकडून वाद घातला जात होता. विक्रेत्यांकडून परवानगी नसतानाही जिल्हा शासकीय रुग्णालयाबाहेरील जागेत गाळे उभारले जात असत. सिंहस्थ कुंभमेळ्यातील पर्वणीच्या कालावधीत सदर विक्रेत्यांना पोलिसांसह महापालिकेने जिल्हा शासकीय रुग्णालय परिसरात गाळे उभारणीस मनाई केली होती. मागील वर्षीही ही मनाई कायम राहिली. त्यामुळे विक्रेत्यांना इदगाह मैदानावर गाळे उभारणीस परवानगी देण्यात आली व त्याबाबत लिलावप्रक्रिया राबविण्यात आली होती. महापालिकेने आता दरवर्षी इदगाह मैदानावरच मूर्ती विक्रीसाठी गाळे उभारण्यास परवानगी दिली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.