मनमाडमध्ये पाणी ‘कुलपबंद’ ठेवण्याची वेळ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 06:51 PM2019-05-13T18:51:54+5:302019-05-13T18:52:43+5:30
मनमाड: परिसरात यंदा अल्प पावसामुळे शहराला पाणी पुरवठा करणारे वागदर्डी धरण न भरल्याने ऐन उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागत आहेत. २३ दिवसाआड होणाऱ्या पाणी पुरवठयमुळे पाण्यासाठी दाही दिशा भटकण्याची वेळ महिलांवर आली असून येथील श्रावस्तीनगर भागात राहणा-या नागरिकांच्या छतावरच्या टाकीतील पाण्याची चोरी झाल्यामुळे मनमाडकरांवर आता पाणी सुध्दा कुलुपंबद ठेवण्याची वेळ आली आहे.
पाणीटंचाई पाचवीला पुजलेल्या मनमाड शहरात पाण्याअभावी भीषण दुष्काळी परिस्थीती निर्माण झाली आहे. यंदा शहर व परिसरात दमदार पाऊस न झाल्यामुळे भुगर्भातील पाण्याची पातळी खाली गेली असून नागरिकांना भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. शहराला पाणीपुरवठा करणा-या वागदर्डी धरण क्षेत्रात पुरेसा पाऊस न झाल्याने या वर्षी धरणात पाणी आलेच नाही. संपूर्ण वर्षभर मनमाडकरांची तहान पालखेडच्या रोटेशनने भागवली. दुष्काळी परिस्थितीमुळे परिसरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्याच्या उपलब्धतेअभावी पाणीपुरवठ्याच्या दिवसांमध्ये वाढ होत असून तो कालावधी आता २३ दिवसांवर पोहचला आहे. पालिकेकडून देण्यात आलेले पाणी पुढील पाणी येईपर्यंत पुरवावे लागते. येथील श्रावस्तीनगर भागात राहणारे विलास अहिरे यांनी छतावर साठवून ठेवलेल्या पाचशे लिटर पाण्यापैकी जवळपास तीनशे लिटर पाणी चोरी गेल्याची बाब निदर्शनास आली. अहिरे यांच्या घराला बाहेरून जिना असल्यामुळे अज्ञात चोरट्यांनी छतावर जाऊन पाणी लंपास केले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दुष्काळी परिस्थितीमधे पाणी चोरीच्या या घटनेमुळे नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. या प्रकरणी पोलीस स्थानकात तक्रार अर्ज दिला असल्याचे अहिरे यांनी सांगीतले. पाणी चोरीच्या या घटनेमुळे नागरिकांना पाणी कुलूपबंद ठेवण्याची वेळ आली आहे. शहरातील काही नागरिकांनी सुरक्षिततेचा उपाय म्हणून आपापल्या पाण्याच्या टाक्यांना कुलूप लावून पाणी साठवले आहे.