सुटीवर घरी आलेल्या जवानावर काळाची झडप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2021 01:32 AM2021-12-17T01:32:05+5:302021-12-17T01:32:49+5:30
गेल्या दोन- तीन दिवसांपूर्वीच तालुक्यातील रायपूर येथे आपल्या घरी एक महिन्याच्या सुटीवर आलेल्या भारतीय सीमा सुरक्षा दलातील जवानाचा मनमाड- लासलगाव रोडवरील भारत नगरजवळ मंगळवारी (दि.१४) अपघाती मृत्यू झाला. रमेश म्हातारबा गुंजाळ, असे या जवानाचे नाव असून बुधवारी (दि.१५) शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी रायपूर गावावर शोककळा पसरली होती.
चांदवड : गेल्या दोन- तीन दिवसांपूर्वीच तालुक्यातील रायपूर येथे आपल्या घरी एक महिन्याच्या सुटीवर आलेल्या भारतीय सीमा सुरक्षा दलातील जवानाचा मनमाड- लासलगाव रोडवरील भारत नगरजवळ मंगळवारी (दि.१४) अपघाती मृत्यू झाला. रमेश म्हातारबा गुंजाळ, असे या जवानाचे नाव असून बुधवारी (दि.१५) शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी रायपूर गावावर शोककळा पसरली होती.
तालुक्यातील रायपूर येथील भूमिपुत्र व भारतीय सीमा सुरक्षा दलातील कॉन्स्टेबल रमेश म्हतारबा गुंजाळ (३६) हे दोन- तीन दिवसांपूर्वीच एक महिन्याच्या सुटीवर घरी आले होते. मनमाड- लासलगाव रोडवरील भारत नगरजवळ मंगळवारी रात्री चारचाकी व दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात रमेश गुंजाळ यांचा मृत्यू झाला. गुंजाळ हे पत्नी व मुलासमवेत दुचाकी (क्रमांक एमएच १५ एचआर ६१४४)वरून रायपूर येथून मनमाडकडे जात होते. गेल्या एक वर्षापासून ते घरी आले नव्हते. एक महिन्याची सुटी टाकून ते घरी आले असता काळाने त्यांच्यावर झडप घातली. गुंजाळ यांच्या मृत्यूची बातमी समजताच रायपूर गावात शोककळा पसरली होती. बुधवारी सायंकाळी रायपूर येथे रमेश गुंजाळ यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. गुंजाळ यांच्या पश्चात पत्नी सरला, आई हिराबाई, वडील म्हतारबा, भाऊ, भावजयी, मुलगा व मुलगी, पुतण्या- पुतणी, असा परिवार आहे. रमेश गुंजाळ हे सतरा वर्षांपूर्वी बीएसएफमध्ये दाखल झाले होते. राजस्थान येथे कॉन्स्टेबल पदावर ते कार्यरत होते. निवृत्तीसाठी अवघा दीड वर्षाचा कालावधी बाकी असतानाच त्यांना काळाने हिरावून नेले.
इन्फो
मान्यवरांकडून मानवंदना
यावेळी ग्रामस्थांनी ‘जब तक सूरज-चाँद रहेगा, तब तक रमेश का नाम अमर रहेगा’, ‘वंदे मातरम्’, ‘भारत माता की जय’ अशा घोषणा दिल्या. यावेळी आमदार डॉ. राहुल आहेर, तहसीलदार प्रदीप पाटील, पोलीस निरीक्षक समीर बारवकर आदींनी पुष्पगुच्छ अर्पण करून मानवंदना दिली. यावेळी हवेत बंदुकीच्या फैरी झाडून सलामी देण्यात आली.
(१६ रमेश गुंजाळ)
--------------------------------------------------