पाण्याअभावी उन्हाळ कांदे सोडून देण्याची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 06:22 PM2019-03-08T18:22:11+5:302019-03-08T18:22:38+5:30
चणकापूर उजव्या कालव्याला पाणी सुटेल या आशेवर असलेल्या वाजगाव येथील शेतकऱ्यांवर शेतातील उन्हाळी कांदे सोडून देण्याची वेळ आली आहे.
देवळा : चणकापूर उजव्या कालव्याला पाणी सुटेल या आशेवर असलेल्या वाजगाव येथील शेतकऱ्यांवर शेतातील उन्हाळी कांदे सोडून देण्याची वेळ आली आहे.
गतवर्षी पावसाळ्यात चणकापूर उजव्या कालव्याला सोडलेल्या पूरपाण्यामुळे वाजगाव येथील विहिरींना पाणी उतरले होते. रब्बीचा हंगाम पदरात पडेल या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी कांद्याची लागवड केली होती. कारण कांदा लागवडीच्या वेळी या शेतकºयांच्या विहिरींना भरपूर पाणी होते. तसेच दरवर्षी जानेवारी महिन्यात कालव्याला एक आवर्तन सोडले जात होते. यामुळे कांदा पीक सहज निघून येईल या भरवशावर शेतकरी होते.
जानेवारी महिन्यात देवळा येथे विकासकामांच्या उद्घाटनासाठी पालकमंत्री गिरीश महाजन आले असताना वाजगाव येथील शेतकºयांच्या शिष्टमंडळाने त्यांच्या पुढे कैफियत मांडली होती. त्यावेळी महाजन यांनी कालव्याला पाणी सोडण्याबाबत प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले होते; परंतु अद्यापपर्यंत कालव्याला आवर्तन सोडण्यात आले नाही. महिनाभरापासून वाजगाव परिसरातील सर्व विहिरींनी तळ गाठल्यामुळे शेतकºयांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. चणकापूर उजव्या कालव्याला पाणी सोडण्यासाठी दरवर्षी तालुक्यातील शेतकºयांना संघर्ष करावा लागत आहे. चणकापूर उजव्या कालव्याला निश्चित आवर्तन नसल्यामुळे शेतकºयांचे पाण्याचे वेळापत्रक कोलमडते. पिकांचे नियोजन करता येत नाही. यामुळे कालव्याला नियमित आवर्तने करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.