यंदा आंबा करणार तोंड गोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 06:16 PM2021-03-18T18:16:25+5:302021-03-18T18:17:30+5:30
वटार : मध्यंतरी अवकाळी पावसाच्या फटक्यानंतर पोषक वातावरण तयार झाल्याने ग्रामीण भागातील आंब्याची झाडे हिरवीगार झाली असून त्यावर मोहर बहरल्याने यंदा उत्पादनात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
वटार : मध्यंतरी अवकाळी पावसाच्या फटक्यानंतर पोषक वातावरण तयार झाल्याने ग्रामीण भागातील आंब्याची झाडे हिरवीगार झाली असून त्यावर मोहर बहरल्याने यंदा उत्पादनात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
बागलाणच्या पश्चिम पट्यात गावरान जातीची मोठ्या प्रमाणात आंब्याची झाडे आहेत. त्यात गोट्या,सेंद्रया, काळ्या, ढवळ्या, दोडी आदी जातीची झाडे आहेत. तर काही शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीचे नवीन केसर सारख्या आंब्याच्या जाती देखील लावल्या आहेत. मध्यंतरी पडलेल्या थंडीमुळे आंब्याने मोठ्या प्रमाणावर मोहर बहरल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे उच्चांकी पिकाची अपेक्षा आहे.
गेली चार वर्ष लहरी निसर्गाचा फटका बसल्यामुळे सर्वसामान्यांना आवाक्याबाहेर राहिलेला आंबा यंदा सर्वांचे तोंड गोड करण्याची चिन्हे आहेत. दिवसभर वारा चालू असल्यामुळे मोहर काहीसा गळून जात आहे. काही आंब्यावर आलेला मोहोर कुजू लागला असून असा मोहोर काळा पडत आहे. त्यामुळे आंब्याच्या उत्पादनाला फटका बसण्याचीही भीती आहे. ढगाळ वातावरणामुळे आंब्यावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो.
मागील वर्षाच्या तुलनेत ह्या वर्षी आंबे कमी फुटले आहेत व वाऱ्यामुळे मोहरही गळत आहे. बदलत्या हवामानामुळे आंबा उत्पादनात घट होण्याची भीती आहेच पण पोषक वातावरण मिळाले तर आंबा भाव खाणार आहे.
- बाळू खैरनार, शेतकरी, वटार.