सराफा कारागिरांवर उपासमारीची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 06:03 PM2020-05-20T18:03:45+5:302020-05-20T18:03:58+5:30
मनमाड : सराफ बाजार सुरू करण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
मनमाड : सर्वत्र फैलावलेला कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व लॉकडाऊनची असलेली स्थिती यामुळे आजमितीला सर्व व्यवसाय डबघाईला आले आहेत. शासनाने विवाह सोहळ्यांना काही अटींवर परवानगी दिली असली तरी यामध्ये महत्वाचे स्थान असलेल्या आणि ‘सौभाग्याचे लेणं’ घडवणाऱ्या कारागिरांवर मात्र उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे सराफा व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडला आहे.
शासनाने सर्वत्र लग्नविधीस ठराविक अटीवर अनुमती दिलेली आहे. लग्नसराई चा हंगाम संपायला अगदी थोडे दिवस शिल्लक राहिले आहेत. मनमाड शहर व त्यावर अवलंबून असलेल्या ग्रामीण भागातील गावाची संख्या मोठी असून व्यावसायिक उलाढाल ही सराफा बाजारातच होत असते. सध्या लागत असलेल्या लग्न विधी मध्ये पारंपारिक दागिना म्हणून लग्नातील वधू व वर अश्या मंडळींना देवाची स्थापना घरात करूनच सुरु वात करावी लागते. सोबत सौभाग्यवतीचं लेणं म्हणजे सोन्याचे मंगळसूत्र व मणी ह्यांना अनन्यसाधारण महत्व असते. परंतु ह्या दागिन्यांसह,देव घडविणारे सुवर्ण कारागीर यांची दुकाने बंद असल्याने लग्न कार्यात फार मोठी अडचण निर्माण झालेली आहे. शासनाने या सर्व बाजूने विचार करून विषाणू संबघी असलेले सर्व नियम पाळून व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी मनमाड शहर सराफ सुवर्णकार संघटनेच्या वतीने पालिका प्रशासनास निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे.
...मग सराफांनाही द्या परवानगी
मनमाड येथे कंटेन्मेंट झोन असतांना ज्या कसोटीच्या आधारे मद्य विक्र ीस परवानगी देण्यात आली आहे त्याच कसोटीच्या आधारे आम्हाला परवानगी मिळावी असेही या निवेदनात म्हटले आहे. निवेदन देण्यात आले त्याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष अरु ण सोनवणे,संघटक सुरेश लोढा,व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र पारीक, अजित सुराणा,रिखब ललवाणी,विनोद वर्मा आदी उपस्थित होते.