तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 10:10 PM2020-05-13T22:10:53+5:302020-05-14T00:48:47+5:30
नाशिकरोड : नाशिक व अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवरील सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे गावात १५ ते १६ तमाशा मालक व त्यांच्या कलाकारांचे वास्तव्य असून, गेल्या चार वर्षांपासून नोटाबंदी, कोरडा दुष्काळ, निवडणूक आचारसंहिता व यंदाच्या कोरोनामुळे अर्थचक्र पूर्णपणे कोलमडून गेले आहे.
मनोज मालपाणी ।
नाशिकरोड : नाशिक व अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवरील सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे गावात १५ ते १६ तमाशा मालक व त्यांच्या कलाकारांचे वास्तव्य असून, गेल्या चार वर्षांपासून नोटाबंदी, कोरडा दुष्काळ, निवडणूक आचारसंहिता व यंदाच्या कोरोनामुळे अर्थचक्र पूर्णपणे कोलमडून गेले आहे. गुढीपाडवा ते बुद्ध पौर्णिमेच्या काळातील ऐन हंगामात तमाशाच्या सुपाऱ्या रद्द करत अॅडव्हान्स परत करावा लागल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या लोककलावंतांना आर्थिक हातभार दिला नाही, तर लोककला व कलाकार यापासून दूर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे गेल्या २० ते २२ वर्षांपासून पंधरा ते सोळा तमाशाचे मालक आपल्या कलाकारांसह राहतात. हंगामी तमाशा मालक संबंधित गावाच्या पंचकमिटी अथवा पदाधिकाऱ्यांकडून तमाशाची सुपारी, बिदागी घेतल्यानंतर त्या त्या गावाच्या यात्रेत आपला तमाशाचा फड घेऊन जातात. साधारणत: जिल्ह्यात आॅक्टोबर ते फेब्रुवारी या दरम्यान गावोगावी विविध देवीदेवतांच्या नावे यात्रा भरतात. तर नगर, पुणे जिल्ह्यात फेब्रुवारी ते जून या कालावधीपर्यंत यात्रा होतात. या काळात तमाशा फडचालकांचा व्यवसाय तेजीत असतो. मात्र गेल्या तीन वर्षांपासून तमाशा मालक व कलाकार आर्थिक अडचणीत आले आहेत. तीन वर्षांपूर्वीची नोटाबंदी व नंतरच्या काळात कोरडा दुष्काळ, लोकसभा-विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे अनेक गावांच्या यात्रांमध्ये तमाशाकडे पाठ फिरविण्यात आली. त्यामुळे फड चालविण्यासाठी घेतलेले कर्ज तमाशा फड मालकांना फेडता न आल्याने तसेच कलाकारांना योग्य आर्थिक मोबदला देणे शक्य होत नसल्याने चांगले कलाकार मिळणे अवघड झाले आहे. तमाशाच्या माध्यमातून दरवर्षी तमाशा फड मालक ५० ते ६० लाख रुपयांची उलाढाल करतो. यामध्ये प्रत्येक ठिकाणी तमाशाचा मंडप उभारणे, कलाकारांचे पगार, गाडीचे भाडे, खाण्या-पिण्याचा खर्च, जाहिरात, राहुटी उभी करून मॅनेजर नेमणे आदी कामांसाठी २५ ते ३० लाख रुपये दरवर्षी खर्च येतो.
-----------------------------------
कोरोनामुळे सर्वकाही धोक्यात
हंगामी तमाशाचा मोठा सीझन गुढीपाडवा ते बुद्ध पौर्णिमेपर्यंत असतो. तमाशा बुकिंगसाठी नांदूरशिंगोटे व पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे लाखो रुपये खर्च करून राहुटी केली जाते. गावागावात बॅनर लावून जाहिरातबाजी तसेच मॅनेजर नेमणे आदी कामे केली जातात. त्यानंतर कलाकारांना गोळा करून रंगीत तालीम केली जाते. यंदा होळीपासून या हंगामी तमाशा मालकांनी गावाच्या जत्रेतील तमाशाच्या मालकाने सुपारी घेऊन तालीम करण्यास सुरुवात केली होती. यामध्ये तमाशा मालकाने स्वत:चे व कर्ज घेऊन लाखो रुपये गुंतवणूक केली होती. मात्र गुढीपाडव्याच्या चार-पाच दिवस अगोदर कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर करून सार्वजनिक कार्यक्रमांना शासनाने बंदी घातली. यामुळे सर्व जत्रा रद्द करण्यात आल्याने तमाशा मालकांना घेतलेल्या अॅडव्हान्स पुन्हा परत द्यावा लागला. तसेच लॉकडाऊनमुळे इतर जिल्ह्यांतील कलाकार व कामगारांना त्यांच्या गावी जाऊ देण्यात आले.
--------------------
...तरीदेखील करत
आहे नि:स्पृह सेवा
तमाशा मालक, कलाकार हे वेगवेगळ्या जिल्ह्यांतून एकत्र जमले असून, त्यांचा हंगाम लॉकडाऊनमध्ये गेल्याने त्यांच्यावर सर्व प्रकारच्या काटकसरीची वेळ आली आहे. नांदूरशिंगोटे ग्रामपंचायत, काही ग्रामस्थ, दुकानदार, दानशूर नागरिक यांनी काही प्रमाणात त्यांना मदत केली आहे. अत्यंत हलाखीची परिस्थिती असतानासुद्धा त्यातील २५ तमासगीरांनी रक्तदान करून देशसेवेला हातभार लावला आहे. त्यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या, जिल्हा नाकाबंदी ठिकाणी असलेल्या पोलिसांना गेल्या दीड महिन्यापासून दररोज मोफत चहा-पाणी दिला जात आहे.
-----------------------------
तमाशामध्ये लोककलावंत आपली कला सादर करत उपस्थिताना बसविण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो. मात्र गेल्या चार वर्षांपासून आलेल्या विविध अडचणींमुळे लोकांना हसवून आनंद देणाºया या बहुगुणी लोककलावंतांच्या चेहºयावर खरं-खोटं हसू, आनंद द्यायला तयार नाही. ही लोककला व कलाकार जिवंत ठेवण्यासाठी शासनासह सर्वांनी पुढाकार घ्यायला हवा.
- राजू बागुल, आम्रपाली पुणेकर तमाशा मंडळ
----------------------------------
आम्ही हातावरचे असलो तरी लोककलावंत आहोत. आम्ही कला सादर करून सर्वांना हसवून आनंदी करून चार पैसे कमवतो. पण आता अवघड परिस्थिती आहे. शासनाने मदत करण्याची गरज आहे.
- उषा नारायणगावकर, कलाकार