कोरोनामुळे तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:12 AM2021-05-30T04:12:16+5:302021-05-30T04:12:16+5:30
जळगाव नेऊर : तमाशा ही ग्रामीण भागातील लोप पावत चाललेली लोककला जिवंत ठेवण्याचे काम परंपरेने सुरू आहे; परंतु दूरचित्रवाणी, ...
जळगाव नेऊर : तमाशा ही ग्रामीण भागातील लोप पावत चाललेली लोककला जिवंत ठेवण्याचे काम परंपरेने सुरू आहे; परंतु दूरचित्रवाणी, विविध वाहिन्या याचा फटका तमाशा फडांना बसलेला असतानाच गेल्या दीड वर्षापासून कोरोनाने तमाशाचाच तमाशा झाला आहे.
महाराष्ट्राच्या लोकधारेला कोरोनाने रोखल्याने कलावंत उपासमारीने देशोधडीला लागल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे. महाराष्ट्राच्या या जिवंत कलेला जीवदान दिले नाही तर पुन्हा तमाशा उभा राहणे शक्य नसल्याची खंत जाणकार व्यक्त करीत आहेत. ज्या
तमाशा मालकांनी, कलावंतांनी ग्रामीण भागातील शाळांसाठी जे मोलाचे योगदान (आर्थिक) दिले, त्यात विठाबाई नारायणगावकर, दत्तोबा तांबे, तुकाराम खेडकर, काळू-बाळू, साहेबराव नांदवळकर, भिका-भीमा यासह त्यांचा वारसा चालविणारे त्यांचे उत्तराधिकारी वारसदार असून, आजही ते योगदान देत आहेत. त्यांनाच सध्या उपासमारी व आर्थिक संकटाने ग्रासले असून, एक काळ होता रयत शिक्षण संस्था असो की, अन्य छोट्या-मोठ्या शिक्षण संस्थेला, सामाजिक कार्याला, मंदिरांना पैसा उभा करून देण्याचे काम तमाशाच्या रूपाने होत होते. आजही विंचूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या शाखेसाठी दत्तोबा तांबे यांनी उभा करून दिलेला निधी व त्यासाठीची त्यांच्या नावाची संगमरवरी कोनशिला पाहावयास मिळते. त्यांच्याच वारसदारांना महाराष्ट्राने उघड्यावर सोडायचे का, हा प्रश्न असून, शासन दरबारी याची दखल घेतली जाईलच; परंतु सर्वसामान्यांनाही त्यासाठी खारीचा वाटा उचलण्याची चर्चा ग्रामीण भागात होत आहे. कोरोनामुळे यात्रांवर बंदी आली. बाजार बंद झाले, त्यामुळे यांची कुटुंबे उद्ध्वस्त होताना दिसत आहेत.
---------------
गेल्या दीड वर्षापासून तमाशाचे कार्यक्रम बंद असून, शासनही लक्ष देत नाही. कलावंतांची उपासमार सुरू आहे. त्यांना कामधंदा नसल्यामुळे त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले आहे. तमाशा फड मालक, कलावंतांची आर्थिक परिस्थिती खालावली असून, शासनाने यावर लवकरात लवकर विचार करून मदत करावी. मागील वर्षी लॉकडाऊननंतर हळूहळू सर्व व्यवसाय सुरू झाले होते. फक्त तमाशा सुरू झालेला नाही. समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन तमाशा फड मालकांना मदत केली पाहिजे.
-मोहित नारायणगावकर, संचालक विठाबाई भाऊ (मांग) नारायणगावकर तमाशा मंडळ
२९ मोहित नारायणगावकर, २९ जळगाव नेऊर
===Photopath===
290521\29nsk_5_29052021_13.jpg
===Caption===
२९ जळगाव नेऊर, २९ मोहित नारायणगावकर