रुग्णांना जमिनीवर झोपवून उपचार करण्याची वेळ
By Admin | Published: May 16, 2015 01:07 AM2015-05-16T01:07:17+5:302015-05-16T01:07:52+5:30
रुग्णांना जमिनीवर झोपवून उपचार करण्याची वेळ
मालेगाव : शहरात विविध ठिकाणी महानगरपालिका जलवाहिनी गळतीमुळे होणारा दूषित पाणीपुरवठा, शहरातील तीव्र उन्हाळा व खाद्यपदार्थ विक्रेते- रसवंती याठिकाणी असलेल्या अस्वच्छतेमुळे शहरात अतिसाराची साथ पसरली आहे. येथील मनपाच्या वाडिया, अलीअकबर रुग्णालयासह सामान्य रुग्णालयात अतिसाराच्या रुग्णांची गर्दी होत आहे. विशेष म्हणजे पुरेशा पलंगाअभावी सामान्य रुग्णालयात रुग्णांना जमिनीवर झोपवून त्यांच्यावर उपचार करण्याची वेळ रुग्णालय प्रशासनावर आली आहे.
शहरात सध्या मनपातर्फे पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या विविध ठिकाणच्या जलवाहिनींना गळती लागलेली आहे. त्यात शेकडो लिटर पाणी वाया तर जातेच परंतू गटारीलगत असणाऱ्या जलवाहिनींमध्ये दुषित पाणी शिरत असल्याने सध्या शहरातील नागरिकांना दुषित पाणी ग्रहण करावे लागत आहे. त्यामुळे पोटदुखीच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. दुसरीकडे गेल्या दोन - तीन आठवड्यापासून शहरातील तपमान ४० अंशावर आहे. त्याचा दुष्परिणाम नागरिकांचे आरोग्यमान बिघडले आहे. उन्हापासून बचावासाठी नागरिक शहरातील रसवंतीगृहे, ज्युसपार्लर या ठिकाणी धाव घेत आहेत. परंतू या पाहिजे त्या प्रमाणात स्वच्छता पाळली जात नसल्यामुळे येथून रोगाची बाधा होण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच शहरातील अस्वच्छतेमुळे शहरात डासांसोबत माशा, कृमी, कीटक व सुक्ष्मजीवांच्या संख्येतही वाढ झाली आहे. शहरात जागोजागी रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांची संख्या अधिक आहे. तेथे देखील पुरेशी स्वच्छता नसल्यामुळे या खाद्यपदार्थांच्या माध्यमातून नागरिकांना बाधा होत आहे. सामान्य रुग्णालयात तर अतिसारावर उपचारासाठी तीन कक्ष तयार करण्यात आले आहेत. मात्र या कक्षांची मर्यादा ही २० ते २५ एवढीच असून तेवढेच पलंग उपलब्ध आहेत. मात्र येथे रोज उपचारासाठी दाखल होणाऱ्यांची संख्या ७० ते ८० एवढी आहे. आधीचे उपचार घेणारे आणि नव्याने दाखल होणारे रुग्ण यामुळे येथे काही रुग्णांना जमिनीवर झोपवून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. अशीच परिस्थिती मनपाच्या वाडिया व अलीअकबर रुग्णालयात आहे. शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या याहून अधिक आहे. (प्रतिनिधी)