डेंग्यूने ग्रस्त बालिकेवर घरीच उपचाराची वेळ
By admin | Published: October 19, 2014 12:15 AM2014-10-19T00:15:01+5:302014-10-19T16:50:45+5:30
डेंग्यूने ग्रस्त बालिकेवर घरीच उपचाराची वेळ
मालेगाव : तालुक्यातील निमगुले येथील जयश्री सुनील कदम या बारावर्षीय मुलीस डेंग्यूची लागण झाली आहे. एकीकडे येथील सामान्य रुग्णालयात मुलीच्या आजाराचे योग्य निदान झालेले नाही, तर दुसरीकडे खासगी रुग्णालयातील औषधोपचार व खर्च परवडत नसल्यामुळे पैशांअभावी या मुलीवर सध्या घरीच औषधोपचार करण्याची वेळ तिच्या पालकांवर येऊन ठेपली आहे.
सदर मुलीचे पालक हे अशिक्षित असून, त्यांची आर्थिक परिस्थितीही हलाखीची आहे. त्यांना खासगी रुग्णालयातील मुलीचा औषधोपचार परवडेनासा झाला आहे.
दुसरीकडे आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गासाठी आशास्थान असलेल्या सामान्य रुग्णालयातील आरोग्य यंत्रणा ढिसाळ असल्यामुळे मुलीच्या पालकांनी तिच्यावर घरीच औषधोपचाराचा निर्णय घेतला आहे. मात्र यामुळे या मुलीची प्रकृती ही गंभीर आहे. यासंदर्भात निमगुले गाव ज्या मळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कक्षेत येते त्या केंद्राच्या आरोग्य कारभाराविषयीदेखील मुलीच्या पालकांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
यासंदर्भात येथील सामान्य रुग्णालयाशी संपर्क साधला असता संबंधितांनी याप्रश्नी अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे. तसेच ज्या लॅबमध्ये या मुलीचे रक्त-लघवी तपासण्यात आली त्यांनी सदर मुलीस डेंग्यू झाल्याचे स्पष्ट केले आहे. तशी मुलीच्या वैद्यकीय अहवालात नोंदही आहे.
सध्या मुलीची तब्येत गंभीर असून, तिच्यावर योग्य ठिकाणी उपचार होणे गरजेचे आहे. याबाबत शासकीय अशा येथील सामान्य रुग्णालय व्यवस्थापनाची चौकशी करण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)